World Cup 2023: '...तर ही तुमची खूप मोठी चूक असेल', गंभीरने 'त्या' खेळाडूचा उल्लेख करत भारतीय संघाला दिला इशारा

गौतम गंभीरला भारतीय संघाला ईशान किशनच्या जागी केएल राहुलची निवड करत मोठी चूक करु नका असा इशारा दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 7, 2023, 05:01 PM IST
World Cup 2023: '...तर ही तुमची खूप मोठी चूक असेल', गंभीरने 'त्या' खेळाडूचा उल्लेख करत भारतीय संघाला दिला इशारा title=

भारताने एकदिवसीय वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा केली आहे. मात्र अद्यापही भारतासमोर पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी कोणत्या फलंदाजाला संधी द्यायची हा प्रश्न आहे. के एल राहुल मागील अनेक काळापासून ही जबाबदारी पार पाडत आहे. पण त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशनने ज्याप्रकारे खेळी केली आहे, तिने सर्वांना प्रभावित केलं आहेत. यामुळेच अनेकांना के एल राहुलऐवजी ईशान किशनला संधी दिली जावी असं वाटत आहे. यासाठी के एल राहुलला बाहेर बसावं लागलं तरी हरकत नाही. दरम्यान, याच्या उलट विचार करणारेही बरेच जण आहेत. 

स्टार स्पोर्ट्सवर गौतम गंभीर आणि मोहम्मद कैफ यांच्यात फॉर्म विरुद्ध रेकॉर्ड या विषयावर चर्चा झाली. भारताने पाचव्या क्रमांकावर ईशान किशन की के एल राहुल कोणाला संधी द्यावी असा विषय होता. यावेळी गौतम गंभीरने भारताने राहुलच्या जागी ईशानची निवड न करत मोठी चूक करु नये असं म्हटलं. 

"जर भारतीय संघाने केएल राहुलच्या आधी ईशान किशनला खेळवलं नाही, तर ही फार मोठी चूक असेल," असं गौतम गंभीरने सांगितलं. गौतम गंभीरने यावेळी आपल्या या मतावर स्पष्टीकरणही दिलं. पहिल्या क्रमांकावर असो किंवा मग मधल्या फळीत, ईशान किशनने गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्य दाखवलं आहे. यामुळे त्याला संघात जागा मिळाली पाहिजे असं गंभीरने सांगितलं. 

पुढे त्याने म्हटलं की "मुद्दा हा आहे की, जेव्हा तुम्ही वर्ल्डकप जिंकण्याची तयारी करत असता तेव्हा तुम्ही नाव नाही तर फॉर्मच्या आधारे निष्कर्ष काढता. जे खेळाडू मैदानात चांगली कामगिरी करत वर्ल्डकप जिंकण्यात मदत करतील त्यांची निवड होते". आपली जागा नक्की करण्यासाठी जे काही करता येईल तेव्हा ते सर्व ईशान किशनने केलं आहे अस गंभीरने म्हटलं. 

चर्चेदरम्यान, गंभीरने कैफला, जर विराट कोहली किंवा रोहित शर्मासारख्या एखाद्याने इशानसारखं सलग सामन्यांमध्ये अर्धशतके केली असती तर त्यांच्या जागी के एल राहुलच्या नावासाठी आग्रह केला असता का? अशी विचारणा केली. "फक्त तो ईशान किशन आहे आणि त्याने फार आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत, म्हणून तुम्ही त्याच्या जागी के एल राहुलला संधी द्या असं सांगत आहात," असं गंभीर म्हणाला.

"जर विराट कोहली किंवा रोहित शर्मा हे ईशान किशनच्या जागी असते तर के एल राहुलने त्यांची जागा घेतली असती का? याचं उत्तर नाही आहे," यावर गंभीरने जोर दिला.

आशिया चषक 2023 साठी के एल राहुल भारतीय संघात परतला आहे, रविवारी सुपर 4 फेरीत पाकिस्तानविरोधातील सामन्यात तो उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे. भारताच्या विश्वचषक संघासाठीही, इशान आणि राहुल यांना दोन यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवडण्यात आलं आहे. दोघांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष आहे. पण जर श्रेयस अय्यला बाहेर बसवलं तर दोघांनाही संधी मिळू शकते.