World Cup Final India Vs Australia Head To Head: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तब्बल एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, आतापर्यंतच्या वर्ल्ड कप विजेत्या संघांचे सर्व कर्णधार, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बरेच व्हिआयपी या सामन्यासाठी उपस्थित राहणार आहे. या सामन्याची सगळी तयारी पूर्ण झाली असली आणि दोन्ही संघांकडून आम्हीच चषक जिंकू असा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्याची आकडेवारी ही भारतीयांचं टेन्शन वाढवणारी आहे. नेकमे या संघांनी एकमेकांविरोधात किती सामने खेळलेत आणि किती सामन्यांमध्ये कोण जिंकलं आहे हे पाहूयात..
भारतीय संघाचा वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. 8 ऑक्टोबरचा हा सामना भारताने 6 विकेट्स आणि 52 बॉल राखून जिंकला होता. त्यानंतर 11 ऑक्टोबरला भारताने अफगाणिस्तानला 35 ओव्हरमध्येच 8 विकेट्स राखून मात दिली. 14 ऑक्टोबर रोजी भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने पराभूत केलं. 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशचा संघ भारताकडून 7 विकेट्सने पराभूत झाला. भारताने तब्बल 21 वर्षानंतर वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडला पराभूत करण्याचा पराक्रम 22 ऑक्टोबर 2023 रोजी केला. भारताने सामना 4 विकेट्सने जिंकला. त्यानंतर 29 ऑक्टोबरला भारताने इंग्लंडला 100 धावांनी पराभूत केलं. भारताने 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेला विक्रमी अशा 302 धावांनी धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेचाही भारताने 243 धावांच्या मोठ्या फरकाने 5 नोव्हेंबर रोजी पराभव केला. साखळीफेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलॅण्डला 160 धावांनी हरवलं.
सेमी-फायनलमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारताने 70 धावांनी विजय मिळवत वर्ल्ड कप फायनलमध्ये चौथ्यांदा प्रवेश केला.
नक्की वाचा >> World Cup Final: टॉस जिंकल्यावर बॅटिंग करणार की बॉलिंग? रोहित स्पष्टच म्हणाला, 'मला वाटतं की टॉस..'
ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेला अडखळती सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात यजमान भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने हरवलं. त्यानंतर पुढच्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय वर्ल्ड कपच्या 14 व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मिळाला. त्यांनी हा सामना 5 विकेट्सने जिंकला. ऑस्ट्रेलियाने त्यानंतर 20 ऑक्टोबरला पाकिस्तानला 62 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने 25 ऑक्टोबरच्या सामन्यात नेदरलॅण्डला 309 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने 28 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धचा सामना अवघ्या 5 धावांनी जिंकला. त्यानेतर 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 33 धावांनी पराभूत केलं. 7 नोव्हेंबरला अफगाणिस्तानला 3 विकेट्सने पराभूत केलेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने एकट्याने नाबाद 201 धावा केला. त्यानंतर 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्धचा सामना 8 विकेट्सने जिंकला.
सेमी-फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना संघर्षपूर्ण पद्धतीने जिंकला. ऑस्ट्रेलियाने हा लो स्कोअरिंग सामना 3 विकेट्सने जिंकून फायलनमध्ये एन्ट्री मिळवली.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 13 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं आहे. ऑस्ट्रेलियाने या 13 पैकी सामने जिंकले असून केवळ 5 सामन्यांमध्ये भारताला यश आलं आहे. विशेष म्हणजे 2003 च्या वर्ल्ड कपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने 125 धावांनी जिंकला होता. मात्र यंदाच्या वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यामध्येच भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केलं. ऑस्ट्रेलियन संघाल 199 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हे लक्ष्य 52 बॉल आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. विशेष म्हणजे वर्ल्ड कप सुरु होण्याआधी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेमध्येही भारताने 2-1 ने मालिका जिंकली होती. त्यामुळे वर्ल्ड कपची एकूण आकडेवारी जरी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने असली तर भारताची मागील काही काळातील कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं अशक्य नाही.