मुंबई : सार्वजनिक प्रवासात सार्वजनिक वाहनं हे नेहमी उशीरा येतात, अशी प्रवाशांची धारणा असते. प्रवाशांच्या या समस्याचं निदान गूगल मॅपने शोधून काढलं आहे. देशातील प्रमुख दहा शहरांमध्ये बसने प्रवास करतानाचा लागणारा वेळही आता गूगल मॅप दाखवणार आहे. एवढंच नाही तर भारतीय रेल्वेची सध्याची स्थितीची माहितीही गूगल मॅपवर उपलब्ध होणार आहे.
कंपनीने याविषयी अधिक माहिती देताना म्हटलंय, या सोबतच प्रवासी रिक्षा आणि इतर सार्वजनिक वाहनांचेही पर्याय गूगल मॅपवर उपलब्ध असतील. या सेवेमुळे प्रवाशांना सार्वजनिक वाहनाच्या माध्यमातून आपला प्रवास सुखकर आणि वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल.
गूगल मॅपचे प्रकल्प व्यवस्थापक तायलाह हसबल्लाह यांनी सांगितलं की, गूगलमध्ये आम्ही असं काही फीचर जोडण्याचा प्रयत्न करत आहोत की, ज्यामुळे प्रवाशांना जास्तीत जास्त चांगले अनुभव मिळायला हवे.
आम्हाला आशा आहे की, हे नवीन फीचर ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल. या फीचरमुळे प्रवाशांना दिल्ली, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, पुणे, लखनऊ, चेन्नई, मैसूर, कोयंबतूर आणि सुरत या शहरांमध्ये बसची लाईव्ह माहिती दिसेल.