मुंबई : ऑनलाईन शॉपिंगचे तुम्हीही चाहते असाल तर ही बातमी नक्कीच एकदा नजरेखालून घाला... ऑनलाईन शॉपिंगमुळे वेळेची बचत होते, अनेक गोष्टी एकाच वेळी पाहता येतात आणि घासाघीसही करावी लागत नाही, त्यामुळे तरुणाईचा ओढा ऑनलाईन शॉपिंगकडे जास्त असतो. पण, ऑनलाईन शॉपिंगमुळे तुमच्यासोबत फसवणूकही होऊ शकते, हे अनेक उदाहरणांतून स्पष्टही झालंय. आता पुन्हा एकदा असाच किस्सा घडलाय. एका व्यक्तीनं ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टहून शाओमी रेडीमी नोट ५ स्मार्टफोन ऑर्डर केला होता. परंतु, जेव्हा हे बॉक्स त्याच्या हातात पडला तेव्हा मात्र या व्यक्तीला कपाळावर हात मारण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
रांचीमध्ये राहणाऱ्या सुधीर कुमार शर्मा यांना या फसवणुकीला सामोरं जावं लागलंय. त्यांनी २३ मे रोजी शाओमी रेडमी नोट ५ हा स्मार्टफोन ऑर्डर केला होता. परंतु, कुरिअरनं दाखल झालेल्या बॉक्समध्ये स्मार्टफोनऐवजी चक्क तीन साबण सापडले. लाल, सफेद आणि पिवळ्या रंगाचा साबण पाहून सुधीर कुमार यांच्या चेहऱ्याचाच रंग उडाला.
या घटनेचा व्हिडिओ काढून सुधीर यांनी फ्लिपकार्टकडेही याची तक्रार केलीय. फ्लिपकार्टनं यावर उत्तर देत येत्या १२ दिवसांत ही चूक सुधारण्याचं आश्वासन दिलंयL.