मोबाईल बँकिंग अॅप वापरताय? सावधान ! तुमच्या मोबाईलमध्ये नवा बँकिंग व्हायरस?

अशी घ्या खबरदारी नाहीतर तुमचं अकाऊंट रिकामं झालंच समजा...

Updated: Sep 16, 2022, 09:56 PM IST
मोबाईल बँकिंग अॅप वापरताय? सावधान ! तुमच्या मोबाईलमध्ये नवा बँकिंग व्हायरस? title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : तुम्ही जर तुमच्या बँकेचे व्यवहार मोबाईलमधून (Mobile Banking) करत असाल किंवा कुठलंही बँकिंग अॅप्लिकेशन (Banking Application) वापरत असाल तर सावधान. कारण बँकिंग अॅप्लिकेशन हॅक (Hack) करणारा एक व्हायरस (Virus) सध्या धुमाकूळ घालतोय. अवघ्या काही मिनिटात हा व्हायरस तुमच्या मोबाईलमधल्या बँकिंग अॅप्लिकेशन्समध्ये शिरतो आणि तुमचं बँक अकाऊंट (Bank Account) रिकामं करतो. भारतीय सायबर सुरक्षा एजन्सीनं (Indian Cyber ​​Security Agency) या व्हायरसबद्दल मोबाईल युजर्सना अलर्ट केलंय. नेमका हा व्हायरस कसं काम करतो आणि तुमचं अकाऊंट रिकामं कसं करतो पाहुयात...

तुमचं अकाऊंट रिकामं करणारा बँकिंग व्हायरस 

नवीन अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना हा व्हायरस मोबाईलमध्ये शिरतो

एकदा फोनमध्ये हा व्हायरस शिरला तर त्याला हटवणं कठीण जातं

अॅप्लिकेशन लॉगिंगच्या माध्यमातून पासवर्ड, नाव आणि कुकीजची चोरी करतो

हा व्हायरस 200 हून अधिक बँकिंग अॅप्लिकेशन्सची डमी तयार करु शकतो

गोपनीय माहिती सर्व्हरच्या माध्यमातून हॅकर्सना पाठवतो

मिनिटाभरात तुमची गोपनीय माहिती हॅकर्सपर्यंत पोहचतो

व्हायरसच्या निशाण्यावर तुमच्या बँक अकाऊंटचे पासवर्ड असतात

अमेरिका, रशिया आणि स्पेनमध्ये या ट्रोजन व्हायरसनं (Trojan Virus) धुमाकूळ घातलाय. जुलै 2022 मध्ये हा व्हायरस भारतात आलाय. यापूर्वीच्या अनेक बँकिंग व्हायरसपेक्षा हा व्हायरस अधिक घातक आहे. कारण मोबाईलमधून हा व्हायरस हटवणं सोपं नाही. म्हणूनच भारतीय सायबर सुरक्षा एजन्सीनं या व्हायरबाबत आता निर्वाणीचा इशारा दिलाय.

त्यामुळे तुम्हीही एखादं अॅप्लिकेशन डाऊनलोड करत असाल तर ते डमी अॅप्लिकेशन तर नाही ना याबाबत योग्य खबरदारी घ्या. नाहीतर तुमचं अकाऊंट रिकामं झालंच समजा...