पुणे: मुठा कालवा फुटी प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या अजब स्पष्टीकरणानंतर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत. मुठा कालवा हा उंदीर, घुस, खेकड्यांमुळे फुटल्याचे महाजन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. यानंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने फ्लेक्स लावून महाजन यांच्या विधानाचा निषेध केला. 'उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे पुण्याचा कालवा फुटला, वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस' असा मजकूर या फ्लेक्सवर लिहला आहे. त्यामुळे भाजप आता या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास मुठा कालवा फुटल्याने एकच हाहाकार उडाला होता. दांडेकर पुलाजवळील वसाहतीत कालव्याचे पाणी शिरल्याने येथील घरांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे सामान पाण्यात वाहून गेले, तर काहींचा संसार उघड्यावर पडला.
यानंतर घटनास्थळी राजकीय क्षेत्रातील मंडळींनी भेटी देऊन पीडित नागरिकांशी संवाद साधत मदतीची आश्वासने दिली. दरम्यान, शुक्रवारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही येथील परिस्थीतीचा आढावा घेतला. यावेळी नागरिकांच्या रोषामुळे अनेक नगरसेवक व महापौरांनाही काढता पाय घ्यावा लागला होता.