पुणे: गेल्या तीन दशकांपासून कलाप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला सवाई गंधर्व महोत्सवावर यंदा अनिश्चिततेचे सावट उभे राहिले आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्यात न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा डेक्कन एज्युकेशन सोसायटीने हे मैदान महोत्सवासाठी न्यू इंग्लिश स्कुलचे मैदान देण्यास नकार दिला आहे. क्रीडा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असल्याच्या कारणाने सवाई गंधर्व महोत्सवाला परवानगी नाकारण्यात आल्याचे कळते.
त्यामुळे आता सवाई गंधर्व महोत्सव कुठे होणार, अन्यथा हा महोत्सव रद्द करावा लागणार का, असा प्रश्न संगीतप्रेमींना पडला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या निर्णयाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. या शाळेचे आणि सवाई गंधर्व महोत्सवाचे अनोखे नाते तयार झाले होते. अनेक संगीतप्रेमी एखाद्या तीर्थयात्रेप्रमाणे दरवर्षी या महोत्सवाला हजेरी लावतात. मात्र, आता शाळेकडून क्रीडा प्रशिक्षण वर्गाचे कारण देत सवाई गंधर्व महोत्सवाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, आम्ही यावर तोडगा काढायचा प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गायक उपेंद्र भट यांनी व्यक्त केली.