पुणे: आपण आतापर्यंत एखादे घर किंवा जमीन हडपली गेल्याचा प्रकार ऐकला असेल. मात्र, लोणावळ्यात चक्क एक पोलीस चौकीच हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आय.एस. पाटील या पोलीस अधिकाऱ्याने हा प्रताप केला आहे. येथील वळवण भागात आय.एस. पाटील यांच्या पुढाकारने लोकसहभागातून पोलीस चौकी उभारण्यात आली होती. यासाठी नारायण धाम संस्थेने १५ लाखांची आर्थिक मदतही केली होती. मात्र, ही चौकी उभी राहिल्यानंतर काही दिवसांतच आय.एस. पाटील यांनी आपले खरे रंग दाखवले.
आता या पोलीस चौकीची अवस्था पाहायला गेल्यास अनेकांना धक्का बसेल. या पोलीस चौकीत सध्या हॉटेल चालवण्यात येत आहे. तसेच पोलीस चौकीच्या दर्शन भागात सुमन पाटील अशा नावाची पाटी दिसते. या सगळ्याची अधिक चौकशी केल्यानंतर आय.एस. पाटील यांनी रचलेला बनाव पुढे आला आहे. लोकसहभागातून पोलीस चौकी उभारताना आय.एस. पाटील यांनी जागेची मालकी आपली नातेवाईक सुमन पाटील हिच्या नावावर केली. विशेष म्हणजे ही जागा टपाल कार्यालयासाठी आरक्षित होती. मात्र, त्यावर बांधकाम करताना नगरपरिषदेची परवानगीही घेण्यात आली नव्हती. यानंतर चौकीत हॉटेल सुरु झाल्यानंतरही पोलीस खाते मूग गिळून शांत बसले होते. त्यामुळे आता पोलिसांच्या एकूण भूमिकेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अखेर मुंबईतील पोलीस प्राधिकरण समितीकडे तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. सध्या या समितीकडून प्रकरणाची चौकशी सुरु आहे.