Boy Killed by Pumping Air in Body: पुण्यातील हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फूड प्रोसेसिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या शरीरामध्ये गुद्द्वारामधून हवा भरली. एअर कॉम्प्रेसरचा पाईप लावून या मुलाच्या अंगात हवा भरण्यात आली. या अघोरी प्रकारामुळे अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. हडपसर येथील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव धीरजसिंग गोपालसिंग गौड असं असून तो 21 वर्षांचा आहे. तर शरीरामध्ये हवा भरल्याने मरण पावलेल्या मुलाचं नाव मोतीलाल साहू असे आहे. या प्रकरणामध्ये मध्य प्रदेशमधील बडगाव येथे राहणाऱ्या शंकरदिन रामदिन साहू यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. फिर्यादी शंकरदिन आणि त्यांचा भाचा मोतीलाल, आरोपी धीरज सिंग हे तिघेही हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये असलेल्या 'पुना फ्लोअर अँड फूड्स' कंपनीमध्ये काम करतात. कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर धीरजसिंग काम करीत होता. त्यावेळी धीरजसिंग आणि मोतीलाल त्यांच्यात चेष्टा मस्करी सुरू होती. त्याचवेळी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मस्करी सुरु असतानाच अचानक आरोपीने मोतीलालला पकडले आणि हवेचा कॉम्प्रेसर सुरू केला. या कॉम्प्रेसरचा पाईप मोतीलालच्या गुद्द्वाराला लावून त्याच्या शरीरात हवा भरली. कॉम्प्रेसरमधील हवेचा दाब एवढा होता की ही हवा पोटात गेल्याने मोतीलालला अंतर्गत शारीरिक इजा झाली. याचा परिणाम एवढा गंभीर होता की मोतीलालचा तडफडून जागीच मृत्यू झाला. मोतीलालला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्याची संधीही मिळाली नाही. हवेच्या दाबामुळे अंतर्गत इजा झाल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन मोतीलालचा मृत्यू झाला. हडपसर इंडस्ट्रियल एरियामध्ये घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आरोपी धीरजसिंग सोमवारीच ताब्यात घेतले होते. त्यानंतर मृत मोतीलालच्या मामाने लेखी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत. मस्करीत केलेल्या कृतीमुळे मित्राचा मृत्यू होईल याची कल्पना धीरजसिंगला नव्हती असा त्याचा दावा आहे. या घटनेमुळे धीरजसिंगलाही मोठा धक्का बसला आहे.