पुणे: शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद आता स्थानिक राजकारणातही उमटू लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासदार गिरीश बापट आणि शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी गिरीश बापट यांच्यामुळेच युतीधर्म पाळला गेला नाही. गिरीश बापट म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी शकुनीमामा आहेत, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे. ते चाकण येथील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत शिवाजी आढळराव पाटील यांना शिरूर या बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता.
या पार्श्वभूमीवर शिवाजी आढळराव पाटील यांनी बापटांना लक्ष्य केले. गिरीश बापट यांनी पुणे जिल्ह्यात शिवसेना पक्ष संपवण्याचे काम केले. जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार पडण्यासाठी गिरीश बापट हेच कारणीभूत आहेत. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही केलेल्या कामांचे श्रेयदेखील त्यांनी आम्हाला मिळून दिले नाही. विधानसभा निवडणुकीला सुरेश गोरे यांचा पराभवही बापट यांच्यामुळेच झाला. बापटांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना फोन करून बंडखोर उमेदवाराचे काम करा, असे सांगितल्याचा आरोप शिवाजी आढळराव पाटील यांनी केला.
दरम्यान, बापट यांच्या समर्थकांकडून शिवाजी आढळराव पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवाजी आढळराव पाटील यांनी आपल्या पराभवाचे खापर बापट यांच्या माथी मारून स्वत:च्या मतदारसंघातील नाराजी लपवू नये. गिरीश बापट हे लोकनेते आहेत. त्यांनीच पुणे शहरात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांना एकत्र बांधून ठेवले आहे, असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले.