Health News : कोरोनानंतर संपूर्ण जग सावरलं आणि आता कुठं ती विस्कटलेली घडी पुन्हा एकदा व्यवस्थित होताना दिसत आहे. कैक देशांमधील जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. त्यातच एका नव्या संकटाची चाहूल लागल्यानं आरोग्य यंत्रणांना हादराच बसला आहे. परदेशवारी करून आला असाल किंवा परदेशात जाण्याचा बेत आखत असाल तर सावध व्हा. कारण, जवळपास 17 देशांमध्ये एका भयंकर विषाणूजन्य आजाराचा संसर्ग फोफावला असून, हा संसर्ग अतिशय वेगानं इतरांमध्ये संक्रमित होत असल्याचं वृत्त आहे.
या संसर्गामध्ये डोळ्यातून रक्त वाहू लागणाऱ्या मारबर्ग वायरसचाही समावेश आहे. कैक देशांमध्ये या विषाणूच्या संसर्गानं आणि इतरांमध्ये त्याची लागण होण्याच्या वेगानं चिंता वाढवली आहे. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार ज्या देशांमध्ये मारबर्ग वायरसचा संसर्ग वाढला आहे तिथंतिथं प्रवास न करण्याचा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी प्रवाशांना दिला आहे. आतापर्यंत या विषाणूमुळं आफ्रिकी देश रवांडा इथं 15 हून अधिकांचा मृत्यू ओढावला.
सध्या जगावर अनेक विषाणूजन्य आजारांचं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. 'स्लॉथ फीवर' नावानं ओळखला जाणारा ओरोपूचे वायरस सध्या दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये अतिशय वेगानं पसरत असून, यामुळं ब्राझील, बोलीविया, कोलंबिया, क्यूबा, इक्वाडोर, डोमिनिकन गणराज्य, गयाना, पेरू आणि पनामा धोक्यात असल्याचं स्पष्ट होत आहे. या संसर्गामध्ये सांधेदुधी, डोकेदुखी, प्रकाशाकडे पाहण्यास त्रास आणि मळमळ अशा लक्षणांचा समावेश आहे.
डोळे, कान, तोंडातून रक्त येणं. ताप, सर्दी आणि थकवा अशी या संसर्गाची प्राथमिक लक्षणं आहेत. या संसर्गाची लागण होणाऱ्या व्यक्तींची शरीरयष्टी लगेचच बदलण्यास सुरुवात होते असं निरीक्षण सांगतं. सध्यातरी या मारबर्ग विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळं आरोग्य यंत्रणांची चिंता आणखी वाढत आहे.