Warren Buffet Wealth : जागतिक स्तरावरील धनाढ्य व्यक्तींचा जेव्हाजेव्हा उल्लेख होतो तेव्हातेव्हा एक नाव सातत्यानं समोर येतं. हे नाव म्हणजे जगविख्यात गुंतवणूकदार वॉरन बफे यांचं. अमाप संपत्तीची मालकी असणाऱ्या वॉरन बफे यांनी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांच्या या श्रीमंतीचा वारसदार निश्चित केला आहे. सोमवारीच त्यांनी बर्कशायर हॅथवेच्या 1.1 अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिकच्या रकमेचे शेअर चार संस्थांना देण्याची आपली योजना असल्याचं स्पष्ट केलं.
निधनापश्चात आपल्या तब्बल 147.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीचा उत्तराधिकारी नेमका कोण असेल यावरूनही बफे यांनी पडदा उचला. वॉरन बफे यांच्या उत्तराधिकाऱ्याचं नाव आणि ओळख अद्याप जगासमोर आली नसली तरीही यासंदर्भात आपल्या मुलांना पूर्ण कल्पना असून त्यांचीही यास सहमती असल्याचं त्यांनीच स्पष्ट केलं.
वॉरन बफे यांची तीन मुलं असून, त्यांनी आधीच आपल्या निधनानंतर 10 वर्षांनी उर्वरित 147.4 अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या रकमेची संपत्ती वितरित करतील असं सांगितलं होतं. पण, ही संपत्ती वितरित होण्याआधीच बफे यांच्या मुलांचंही निधन होऊ शकतं ही बाब हेरत पण, बफे यांनी आता आपला वारसदार ठरवला आहे. आपल्या कुटुंबात घराणेशाहीच्या संपत्तीत आणखी वाढ करण्यात कोणालाच रस नसल्याचं म्हणत आपल्या पहिल्या आणि सध्याच्या पत्नींनाही याची कल्पना असल्याचं बफे यांनी सांगितलं. इतकंच नव्हे, तर हॉवर्ड, पीटर आणि सूसीला मोठी रक्कम दिल्याच्या वृत्तालाही त्यांनी दुजोरा दिला.
वॉरन बफे यांच्याकडे असणाऱ्या एकूण संपत्तीचा आकडा इतका मोठा आहे, की त्यांनी ही इतकी संपत्ती नेमकी कशी कमवली याविषयीच अनेकांना कुतूहलपूर्ण प्रश्न पडतात. यावर उत्तर म्हणजे चक्रवाढ व्याजाची ताकद आणि बर्कशायर समुहाची स्थिरस्थावर प्रगती. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये भागिदारीसमवेत अब्जावधींच्या अॅपल कंपनीमधील शेअर खरेदी यांसारख्या कैक तरबेज गुंतवणुकांमुळं बफे यांच्या संपत्तीत प्रचंड भर पडली.
वर्षानुवर्षांपासून बफे यांनी त्यांच्या बर्कशायरमधील एकाही शेअरची विक्री केलेली नाही, याशिवाय त्यांनी पैशासंबंधीच्या लालसेचाही विरोध केला. इतकी श्रीमंती असतानाही बफे त्यांच्या ओमाहा इथं असणाऱ्या अनेक वर्षे जुन्या घरात राहणंच पसंत करतात.
गडगंज श्रीमंती असणारे बफे सढळहस्ते अनेकांना आर्थिक मदतही करतात. त्यांनी बिल गेट्स फाऊंडेशनला तब्बल 55 बिलियन अमेरिकी डॉलर किमतीचे शएअर दान केले होते. सध्या ते त्यांच्याच बर्कशायर समुहात अध्यक्ष आणि सीईओ म्हणून काम करत असून, इतक्यात तरी आपला सेवानिवृत्तीचा बेत नसल्याचं सांगतात.