वॉशिंग्टन : मध्य अमेरिकास्थित 'अल सल्वाडोर' या देशातील 'ऑस्कर अलबर्टो मार्टिनेज रामिरेज' हा आपल्या अवघ्या २३ महिन्यांच्या 'वालेरिया' या मुलीसोबत अमेरिकेत शरण घेण्यासाठी निघाला होता. आपल्या कुटुंबीयांसाठी एका चांगल्या आणि सुरक्षित आयुष्याची स्वप्नं तो पाहत होता. परंतु, यासाठी त्यानं आपला जीव धोक्यात घालत रियो ग्रांडे नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यानं आपल्या लाडक्या चिमुरडीला आपल्या टी-शर्टमध्ये बांधलं होतं. नदीच्या तेज प्रवाहात आपल्यापासून विलग होऊ नये यासाठी त्यानं मुलीला स्वत:ला बांधलं होतं. मुलीनंही पाठिमागून त्याच्या गळ्यात टाकत आपल्या बाबाला घट्ट धरून ठेवलं होतं. पण, दोघांचंही दुर्दैव आड आलं... आणि त्यांचं सुरक्षित आयुष्याचं स्वप्नही नदीत वाहून गेलं.
ऑस्कर आई रोजा रामिरेज यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक अलबर्टो अमेरिकेत शरण मिळवण्याच्या प्रयत्नात होता. यासाठी त्याला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या समोर स्वत:ला हजर करायचं होतं पण यात त्याला यश येत नव्हतं. यासाठीच गेल्या रविवारी २३ जून रोजी अलबर्टोनं मुलगी वालेरिया आणि पत्नी तानिया वानेसा अवालोस हिच्यासोबत नदी पार करत अमेरिकेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, नदी पार करत असताना नदीच्या तेज प्रवाहात बाप-मुलीला आपला जीव गमवावा लागला.
उल्लेखनीय म्हणजे याच नदी किनाऱ्यावर यूएस बॉर्डरवर सुरक्षा यंत्रणेला दोन दिवसांपूर्वी चार मृतदेह आढळले होते. यातील तीन लहान मृतदेह लहान मुलांचे होते तर एक २० वर्षीय तरुणीचा मृतदेह यात होता.
ज्या ठिकाणी या बाप-मुलीचा मृतदेह आढळला ते ठिकाण अमेरिकेच्या टेक्सास सीमेपासून केवळ १०० यार्डवर होतं. इथून जवळपास केवळ दीड किलोमीटर अंतरावर एक आंतरराष्ट्रीय पूल आहे जो मॅक्सिको आणि अमेरिकेला जोडतो.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मॅक्सिकोच नाही तर संपूर्ण जगातून अवैध पद्धतीनं अमेरिकेत शरण घेणाऱ्यांप्रती कठोर भूमिका घेतलीय. मॅक्सिकोच्या संपूर्ण सीमारेषेवर भिंत घालण्याचाही निर्णय त्यांनी घेतलाय. तरीदेखील अमेरिका-मॅक्सिकोच्या बॉर्डरवर हजारो शरणार्थी अमेरिकेत दाखल होण्याच्या तयारीत आहेत. परंतु, 'अमेरिकेच्या संसाधनांवर पहिला हक्क अमेरिकन नागरिकांचा आहे. शरणार्थींमुळे अमेरिकन नागरिकांवर अन्याय होत आहे, त्यांना रोजगार मिळत नाही... अमेरिका जगासाठी पोलिसांचं काम करणार नाही', अशी कठोर भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच स्पष्ट केलीय.
अलबर्टो आणि त्याच्या शर्टात गुंडाळलेला मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर या हृदयद्रावक फोटोनं अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. बाप-लेकीच्या या फोटोनं तीन वर्षांपूर्वीच्या एलन कुर्दीच्या आठवणी ताज्या केल्या. २०१५ साली तुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर चिमुकल्या एलन कुर्दीचा मृतदेह आढळला होता. सीरियाच्या शरणार्थींवरचं संकट ढळढळीतपणे दाखवणाऱ्या या फोटोनं अनेकांच्या अंगावर शहारे उभे केले होते.