मुंबई : मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि दिग्गज अब्जाधीश बिल गेट्स यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यांच्या या निर्णयानं सर्वत्र खळबळ उडाली होती. परंतु आता अनेक महिन्यांनतर बिल गेट्स यांनी असं काही वक्तव्य केलं की, ज्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांना त्यांची माजी पत्नी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्याशी त्यांची पुन्हा लग्न करायचं आहे.
खरंतर लग्नाच्या 27 वर्षानंतर या जोडप्याने मे 2021 मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. ऑगस्ट 2021 मध्ये ते दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. तथापि, या जोडप्याने जाहीर केले की ते बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन एकत्र चालवत राहतील. त्यांना तीन मुले आहेत, त्यांची नावे जेनर, रोरी आणि फोबी आहेत.
1 मे रोजी संडे टाइम्सशी बोलताना बिल गेट्स यांनी मागील दोन वर्षांचे वर्णन खूपच नाट्यमय असल्याचे सांगितले. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, कोरोना महामारी आणि घटस्फोटातील सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे मुलांना सोडून जाणे. गेट्स यांनी त्यांच्या माजी पत्नीसोबतच्या सध्याच्या कामकाजाच्या संबंधांबद्दलही बोलले.
याबद्दल बोलताना बिल गेट्स यांनी मुलाखतीत त्याचं लग्न संपल्यानंतर त्यांना आता कसं वाटतंय हेही सांगितलं.
ते म्हणाले की, मुले मोठी झाल्यानंतर आणि कुटुंबातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक विवाह संक्रमणाच्या काळातून जातो आणि त्यांच्याबाबतीत देखील असंच काहीसं घडलं. त्यानंतर त्यांनी आपल्या लग्नाला एक महान विवाह म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, 'यापुढे देखील मी इतर कोणाशीही लग्न न करणे पसंत करेन.'
मेलिंडा फ्रेंच गेट्सशी पुन्हा लग्न करणार का? असे जेव्हा त्यांना या मुलाखतीत विचारले असता. ते म्हणाले की, 'होय, परंतु माझ्या भविष्याच्या दृष्टीने, माझी अशी कोणतीही योजना नाही, परंतु मी लग्नाची शिफारस करतो.'
गेट्स यांनी कबूल केले की, त्यांना त्यांच्या माजी पत्नीसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल ते स्वत:ला खूप "भाग्यवान" समजतात. बिल गेट्स म्हणाले की, त्यांचा विश्वास आहे की, ते अजूनही त्यांच्या माजी पत्नीचे चांगले मित्र आहेत. मेलिंडाशी त्यांचे अतिशय महत्त्वाचे आणि जवळचे नाते असल्याचे त्यांनी सांगितले.