नवी दिल्ली : मुक्ताफळं केवळ भारतातील राजकीय नेत्यांकडूनच उधळली जातात, असे नाही. तर, पाकिस्तानातील सर्वोच्च असलेले न्यायाधीशही यात तसूभरही कमी नाहीत. पाकिस्तानसह अवघ्या जगताला याची प्रतिची नुकतीच आली.
पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच चर्चेत आहे. हा व्हिडिओ निसार साहेबांनी ठोकलेल्या तडाकेबंद आणि तितक्याच वादग्रस्त भाषणाचा आहे. या व्हिडिओत न्यायमूर्ती निसार हे महिलांसंबंधी आक्षेपार्ह विधान करताना दिसत आहेत. झी चोवीस तास डॉट कॉम या व्हिडिओची पूष्टी करत नाही. पण, सोशल मीडियावर या व्हिडिओवर प्रचंड प्रमाणात टीका होताना दिसते आहे.
प्रसारमाध्यमांतून आलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती साकिब निसार यांना एका कार्यक्रमात पाहूणे म्हणून बोलवले होते. या कार्यक्रमात त्यांनी विनोद करण्याच्या भरात अशी काही विधाने केली की, ज्यामुळे ते टीकेच्या गर्तेत अडकले. ते बोलण्यासाठी माईकजवळ येत होते तेव्हा, त्याच्या हातात काही कागद होते. हातातील कागदांकडे निर्देश करत उपस्थितांना उद्देशून ते म्हणाले, 'आपण लोक हे कागद पोहून कदाचित कंटाळला असाल. पण, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी काही लांबलचक भाषण मुळीच नाही देणार. कारण, मला वाटते की, कोणतेही भाषण हे महिलेच्या स्कर्टसारखे असावे. तो इतकाही लांब असू नये की पाहणाऱ्याला कंटाळा येईल. आणि तो इतकाही आखूड नको की, मुख्य भाग सुद्धा झाकला जाणार नाही.'
"Speech should be like a woman's skirt, it should not be too long that one loses the interest and neither too short that it doesn't cover the subject," this is the top judge of Pakistan, Saqib Nisar. #footinmouth pic.twitter.com/SWzq2uHaQj
— Naila Inayat (@nailainayat) January 20, 2018
निसार यांचा ही वक्तव्ये करतानाचा व्हिडिओ एका पाकिस्तानी पत्रकारांनी ट्विट केला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर येताच न्यायमूर्तींवर टीकेचा वर्षाव झाला. तसेच, हा व्हिडिओ व्हायरलही झाला आहे.