जगभरात कोरोना बळींची संख्या २ लाख ३३ हजारांच्याही पार

कोरोना रुग्णांची संख्याही चिंतेत टाकणारी   

Updated: May 2, 2020, 07:06 AM IST
जगभरात कोरोना बळींची संख्या २ लाख ३३ हजारांच्याही पार title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : चीनसोबतच संपूर्ण जगभरात जवळपास १८७ राष्ट्रांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या Coronavirus कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा काही केल्या शमण्याचं नाव घेचाना दिसत नाही आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ३३ लाखांच्या घरात पोहोचण्याच्या मार्गावर आहे. तर, या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ३३ हजारांच्याही पलीकडे गेली आहे. 

अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही ११ लाखांच्याही पलीकडे गेली आहे. त्यामागोमाग स्पेन (रुग्णसंख्या- २,४२,९८८) आणि इटली (२,०७,४२८)  या राष्ट्रांमध्ये कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या राष्ट्रांमागोमाग युनायटेड किंग्डम, जर्मनी आणि फ्रान्स या देशांमध्येही कोरोनाची दहशत आहे. मुख्य म्हणजे हे आकडे अगदी झपाट्याने बदलत आहेत. त्यामुळे या बहुतांश राष्ट्रांमधील आरोग्य यंत्रणांवर यामुळे ताण आल्याचं स्पष्ट होत आहे. 

कोरोना रुग्णांच्या संख्येत जागतिक स्तरावर होणारी ही वाढ शमत नाही, तोच यामध्ये आणखी एक चिंतेची बाब म्हणजे कोरोनाबळींचा वाढता आकडा. सध्याच्या घडीला अमेरिकेमध्ये सर्वाधिक कोरोनाबळींची नोंद केली गेली आहे. जो आकडा दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत या ठिकाणी कोरोनामुळे ६४,७१५ जणांचा बळी गेला आहे. तर, त्यामागोमाग इटली (२८,२३६), युके (२७,५१०) आणि फ्रान्स (२४,५९४)  या राष्ट्रांमध्ये कोरोनाबळींची चिंताजनक संख्या दिसून आली. 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आणि बहुतांश दळवळणांची साधनंही बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राचा वेगही मोठ्या फरकाने मंदावला आहे.  दर दिवशी मोठ्या संख्येने वाढणारे कोरोना रुग्ण आणि त्यातच या विषाणूच्या संसर्गामुळे होणआरे मृत्यू पाहता जागतिक आरोग्य संघटनेपुढेही या वैश्विक महामारीमुळे एक मोठं आवाहनच उभं राहिलं आहे.