नवी दिल्ली : भारतीय वायुदलाकडून २६ फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात एअर स्ट्राईक करण्यात आला. ज्यामध्ये बालाकोट येथे असणाऱ्या दहशतवादी तळाला जमिनदोस्त करत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवदी संघटनेचा मुख्य तळ समजल्या जाणाऱ्या बालाकोट येथे उपस्थित असणाऱ्या ३००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय वायुदलाने केला. एकाच वेळी इतक्या मोठ्या पातळीवर दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानं पाकिस्तान चांगलंच हादरलं. मुळात जैशच्याच एका निर्णयाचा यात भारताला अर्थी फायदा झाला अशी माहितीही सध्या समोर येत आहे.
सूत्रांचा हवाला देत 'टाईम्स ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार पुलवामाच्या आत्मघाती हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी क्रूर दहशतवादी मोठ्या प्रमाणात बालाकोट येथे जमले होते. तेथेच ते येत्या काळात भारतावर आणखी हल्ले करण्याचा बेतही आखणार होते. त्याचवेळी भारतीय वायुदलाने मोठ्या शिताफीने हल्ला करत त्यांना कंठस्नान घातलं. मुख्य म्हणजे भारतीय वायुदलाला जैशच्या या निर्णयाचा मोठा फायदा झाला. त्यामुळे दहशतवादी पुलवामा हल्लल्याचं सेलिब्रेशन करायला आले, अन् यमसदनी गेले अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
वाचा : India Strikes Back : वायुदलाने अशी आखली 'एअर स्ट्राईक'ची योजना
सर्व म्होरके आणि दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्यांना एकाच छताखाली आणण्याचा फटका जैसला बसला. मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर दहशतवादी एकत्र येणार असल्यामुळे जैशकडून कोणत्याही नागरी वस्ती किंवा सैन्यदलाच्या तळानजीकच्या ठिकाणाला प्राधान्य देण्यापेक्षा बालाकोट या डोंगराळ भागाला प्राधान्य दिलं. ज्यामुळे हल्ला करणं भारताला आणखीन सोयीचं झालं.
वाचा : 'एअरस्ट्राईक'साठी बालाकोटची निवड का? अशी होती रणनीती...
बालाकोटमध्ये जेथे जैशचा तळ होता तेथे खेळण्यासाठीचं मैदान, स्विमिंग पूल, रेसिंग ट्रॅक, फायरिंग रेंज आणि सोशल मीडिया वॉर रुम अशा विविध सोयीसुविधा होत्या. जेथे येत्या काही महिन्यांमध्ये भारतात आत्मघाती हल्ले घडवून आणण्याच्या योजना आखण्याचा दहशतवाद्यांचा बेत होता. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी भारताला हा प्रतिबंधात्मक हल्ला करण्याची आणखी एक वाट मिळाली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन करण्यात आलेल्या या हल्ल्यात दहशतवद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आलेल्या पाकिस्तान सैन्यातील माजी लष्कर अधिकारी आणि इतर प्रशिक्षकांचा समावेश होता.