बिजींग : तुम्ही जर सगळ्या मोठ्या, विकसीत आणि विकसनशिल देशात पाहिलत तर तुम्हाला खूप मोठमोठ्या इमारती पाहायला मिळतील. खरेतर आपण इमारतींच्या उंचीवरुन देखील कोणता देश किती प्रगत आहे, या गोष्टीचा अंदाज लावतो. परंतु चीन सरकारची यामागे काही वेगळीच योजना असावी. कारण चीनच्या छोट्या शहरांमध्ये 'सुपर हायराईज इमारती' बांधण्यावर निर्बंध लादले आहेत.
जगातील काही उंच इमारती या चीनमध्ये आहेत. चीनमधील 128 मजली शांघाय टॉवर ही आशियातील सर्वात उंच इमारत आहे. त्याची उंची 632 मीटर आहे.
स्थानिक अहवालानुसार, कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये सुपर हाय राइज बांधण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि असे म्हटले जात आहे की, या महत्वाकांक्षी योजना आहेत परंतु व्यवहारिक नाहीत. या वर्षी जुलैमध्ये चीनने सुरक्षेचे कारण देत 500 मीटरपेक्षा उंच इमारतींच्या बांधकामावर बंदी घातली होती.
दोन महिन्यांपूर्वी मे महिन्यात दक्षिण चीनच्या शेनझेन शहरातील एका बहुमजली इमारतीत भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या घटनेनंतर हे पाऊल उचलण्यात आले होते. त्यानंतर 980 फूट उंच SEG प्लाझामध्ये उपस्थित लोकांना ही इमारत हादरताना जाणवली, त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
चिनी सोशल मीडिया वीबोवर लोकांनी सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. बरेच लोक म्हणतात की, "इतक्या उंच इमारतींची आम्हाला गरज नाही, त्या फक्त दिखाऊ आहेत."
टोंगजी युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्चर एंड अर्बन प्लॅनिंगचे उपप्रमुख झांग शांगवू यांनी चिनी वृत्तपत्र साउथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितले की, "आपण सगळे अशा काळात आहोत जेथे लोकांना असं काही करुन दाखवायचं असतं ज्याची इतिहासात नोंद होईल."
त्यांनी पुढे सांगितले की, "प्रत्येक इमारतीला लँडमार्क बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यासाठी विकासक आणि शहर नियोजक इमारतींमध्ये नवीनता आणि वेगळेपणा शोधत आहेत"
गृहनिर्माण मंत्रालय, शहरी-ग्रामीण विकास आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने या आठवड्यात एक संयुक्त निवेदन जारी केले. त्यात त्यांनी ज्या शहरांमध्ये एकूण लोकसंख्या तीस लाखांपेक्षा कमी आहे, तेथे 150 मीटरपेक्षा जास्त इमारतींच्या बांधकामावर बंदी घातली आहे.
यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये 250 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधण्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की, ज्या शहरांमध्ये लोकसंख्या 30 लाखांपेक्षा कमी आहे, तेथे 150 मीटरपेक्षा जास्त उंचीची इमारत बांधण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल. मात्र, येथे कोणत्याही परिस्थितीत 250 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारती बांधता येणार नाहीत.
त्याचप्रमाणे 30 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये 250 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींच्या बांधकामासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल, मात्र कमाल मर्यादा 500 मीटर असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी आजीवन शिक्षा निश्चित केली जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.