कोरोनाचा कहर, इटलीमध्ये २४ तासात ३६८ लोकांचा मृत्यू

कोरोनाचा इटलीमध्ये कहर

Updated: Mar 16, 2020, 08:31 AM IST
कोरोनाचा कहर, इटलीमध्ये २४ तासात ३६८ लोकांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात दहशत माजवली आहे. चीनच्या वुहान येथून पसरलेला कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक परिणाम हा इटलीवर झाला आहे. रविवारी इटलीमध्ये 368 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूची संख्या 1809 वर पोहोचला आहे. कोरोना झालेल्या लोकांची संख्या 24 हजार 700 वर पोहोचली आहे. चीनच्या बाहेर कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचं प्रमाण वाढतं आहे.

इटलीनंतर इराणमध्ये याचा सर्वाधिक फटका बसला आहे. इरानमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या ७२४ वर पोहोचली आहे. 14 हजार लोकांना याची लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना देशात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. चीनमधून 766, जपानमधून 124, इरानमधून 336 आणि इटलीमधून 218 लोकांना भारतात आणलं गेलं आहे. या लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 6 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एक लाख 55 हजार लोकांना या व्हायरची लागण झाली आहे. जगभरातील 141 देशांमध्ये या व्हायरस पोहोचला आहे.

कोरोना व्हायरसमुळे भारताने 15 एप्रिलपर्यंत सर्व व्हीजावर बंदी घातली आहे. काही महत्त्वाच्या लोकांना सोडून इतर कोणालाही व्हीजा नाकारण्यात येत आहे. फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांच्या व्हीजावर बंदी आहे. तर चीन, साउथ कोरिया, जपान, इटली या देशांवर आधीच बंदी घालण्यात आली आहे.

भारतात आतापर्यंत 112 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येतं आहे. रविवारी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या परिस्थितीवर सार्क देशांच्या नेत्यांशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी आपातकालीन फंडची घोषणा केली आहे.

अनेक राज्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपाययोजना सुरु केल्या आहेत. २२ राज्यांमधील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 19 राज्यांमध्ये सिनेमागृह देखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, बस, रेल्वेमध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. 31 मार्चपर्यंत सिनेमाच्या शूटींगवर ही बंदी घालण्यात आली आहे.