New Zealand Earthquake: गुरुवारी न्यूझीलंडमध्ये 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे हादरे जाणवले. जगभरातील विविध ठिकाणी होणाऱ्या भूकंप आणि तत्सम हालचालींवर नजर ठेवून असणाऱ्या यूनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वे (USGS) या संस्थेकडून भूकंपासंदर्भातील माहिती देण्यात आली. केरमाडेक बेट समुहात 10 किमी अंतरावरील खोलीवर भूकंप आल्याची माहिती सध्या समोर आली असून, भूकंपाची तीव्रता पाहता त्यामुळं झालेली हानी किंवा त्याबाबतची माहिती सध्या समोर आलेली नाही.
USGS च्या माहितीनुसार गुरुवारी सकाळच्या सुमारास न्यूझीलंडच्या उत्तरेकडे असणाऱ्या केरमाडेक बेटांच्या समुहात हा प्रचंड तीव्रतेचा भूकंप आला, ज्याचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर असल्याचं सांगण्यात आलं. समुद्रात आलेल्या या भूकंपामुळं एपिकसेंटरपारून 300 किमी अंतरावर त्सुनामी येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
Notable quake, preliminary info: M 7.0 - Kermadec Islands region https://t.co/zwWR2PZJfQ
— USGS Earthquakes (@USGS_Quakes) March 16, 2023
स्थानिकांच्या माहितीनुसार साधारण 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यानंतर नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पहायला मिळालं. न्यूझीलंड सरकारनंही परिस्थितीचं गांभीर्य आणि भूकंपाची तीव्रता पाहता घटनास्थळी तातडीनं बचाव कार्य सुरु करत अनेक पथकं पाठवली. मागील दोन दिवसांपासून न्यूझीलंडच्या किनारपट्टी भागात चक्रिवादळानं धुमाकूळ घातलेला असतानाच आता आलेल्या भूकंपामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.
न्यूझीलंडमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता जास्त असून, सध्या तिथं नेमकी काय परिस्थिती आहे, याचीच चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, तुर्कीमध्येही काही दिवसांपूर्वी अशाच भूकंपानं हजारो नागरिकांचा बळी घेतला. मागोमागच तुर्कीत साथीच्या रोगांनीही थैमान घातल्याचं पाहायला मिळालं होतं.
संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुर्कीतील भूकंपामुळं मोठं नुकसान झालं होतं. या भूकंपाचे दूरगामी परिणाम दिसणार असून, तब्बल 9.1 कोटी नागरिक यामुळं प्रभावित होतील अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.