नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एक पाकिस्तानी व्हिडिओ सर्वांचच लक्ष वधून घेतोय. पाकिस्तानाच्या एका चॅनलवर लाईव्ह चर्चा सुरू असताना महिला अँकरकडून एक चूक तिला भलतीच महागात पडताना दिसतेय. जगभर या पाकिस्तान अँकरचं हसं उडताना दिसतंय. त्याचं झालं असं की लाईव्ह चर्चेदरम्यान एका व्यक्तीनं 'एप्पल' कंपनीचा उल्लेख केला. परंतु, अँकरचा या 'आयफोन'फेम 'ऍप्पल' आणि इंग्रजीत सफरचंद अर्थात 'Apple' या दोन शब्दांत-त्यांच्या अर्थात गोंधळ उडाला... आणि मग काय... चर्चेदरम्यान हे अज्ञान उघडं पडलं... आणि चर्चेचा हाच व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झालं.
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक पॅनलिस्ट आणि महिला अँकर स्टुडिओमध्ये बसून चर्चा करताना दिसत आहेत. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करताना पॅनलिस्ट म्हणतात, 'जाऊन पाहा व्यवसाय कशाला म्हणतात... ऍप्पलचा बिझनेस, केवळ ऍप्पलचा बिझनेस संपूर्ण पाकिस्तानच्या अर्थसंकल्पापेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे'...
पॅनलिस्टच्या या वाक्यावर काहीतरी बोलावं म्हणून तोंड उघडत अँकर म्हणते, 'होय मीही ऐकलंय की सफरचंदाचे अनेक प्रकार असतात आणि ते खूप महागही असतात'...
Apple business and types of apple, just some regular tv shows in Pakistan.. pic.twitter.com/3Sr7IBl7ns
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) July 4, 2019
यावर पहिल्यांदा पॅनलिस्टला काय म्हणावं तेच कळत नाही... आणि मग अँकरला सुधारत 'आपण सफरचंदाविषयी नाही तर ऍप्पल कंपनीविषयी बोलतोय' असं स्पष्ट करतात.
मग काय, अँकरही हसत-हसत आपली चूक कबूल करते... परंतु, अँकरचा हा मजेशीर अंदाज मात्र व्हायरल होतोय.