नवी दिल्ली : अडचणीच्या वेळी जगातील कोणत्याही कोपऱ्यातून एखाद्या भारतीयानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं... आणि त्याला स्वराज यांच्याकडून उत्तर मिळालं नाही, असं अद्याप घडलेलं नाही. यामुळेच दिवसेंदिवस सुषमा स्वराज यांच्या लोकप्रियतेत भर पडत चाललीय. त्यांच्या फॅन्सच्या यादीत आता एका पाकिस्तानी महिलेचाही समावेश झालाय.
एका पाकिस्तानी नागरिकाला भारतात उपचारांसाठी मदत करण्यासाठी हिजाब आसिफ या पाक महिलेनं सुषमा स्वराज यांचे आभार मानलेत. 'मी तुम्हाला काय म्हणू? सुपरवुमन? गॉड? तुमची उदारता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. केवळ अश्रुंतून मी तुमच्या प्रती आभार व्यक्त करू शकते' असं ट्विट या पाक महिलेनं केलंय.
आणखी एका ट्विटमध्ये तर 'तुमच्यासाठी खूप खूप प्रेम आणि आभार... तुम्ही आमच्या पंतप्रधान असता तर आज हा देश बदलून गेला असता...' असंही या महिलेनं म्हटलंय.
एका पाकिस्तानी नागरिकाला भारतात मेडिकल ट्रिटमेंटसाठी व्हिजाची आवश्यकता होती. त्यांच्यातर्फे आसिफ यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली होती. सुषमा स्वराज यांनी त्याला उत्तर दिलं... आणि तात्काळ इस्लामाबाद स्थित भारतीय उच्चायोगानं आसिफ यांना मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं.