नवी दिल्ली : पुलवामातील दहशतवादी हल्ल्याबाबत जाहीर कबुली देणारा पाकिस्तान आपल्या विधानावरुन पलटी मारताना दिसत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा येथे पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिल्याचे पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी (Fawad Choudhary) यांनी संसदेत जाहीररीत्या म्हटले. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.
आता फवाद चौधरी या विधानावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करत आहेत. २६ फेब्रुवारीला भारताकडून झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तराबद्दल आपण बोललो असं फवाद म्हणाले. माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे फवाद यांनी सांगितले.
आम्ही भारतात घुसून मारले : फवाद चौधरी
पाकिस्तानी संसदेत फवाद चौधरी म्हणाले, 'अय्यास सादिक साहेब काल येथे बोलले. तुम्हाला आदर देण्यात आला, तुम्ही संसदेच्या सभागृहात बोलत आहात आणि मग तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने खोटे बोलता की, एक खोटा माणूसदेखील तसे बोलेल. अध्यक्षांचे पाय थरथर कापत आहेत भारत हल्ला करेल म्हणून, हे असे बोलणार्यांना सांगू इच्छतो की आम्ही भारतात घुसून आणि मारले. पुलवामामध्ये आपले जे यश आहे ते इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली यश आहे. याचे साथीदार आपण सगळे आहोत आणि माझ्यासह तुम्हीही आहात.
भारताच्या दाव्याला बळकटी
पाकिस्तानच्या मंत्र्यांची ही कबुलीदिल्याने भारताच्या दाव्याला आता अधिक बळकटी मिळाली आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह म्हणाले की, पुलवामा हल्ल्याबाबत सुरुवातीपासूनच सगळे संकेत पाकिस्तानकडून मिळत होते. आता याबाबत पाकिस्तानेच ते कबुल केले आहे. पाकिस्तानने ही बाब स्वीकारली ही एक चांगली गोष्ट आहे. पाकिस्तानच्या या कबुलीचा वापर भारत आता एफएटीएफमध्ये काळ्या यादीत टाकण्याची करेल.