नवी दिल्ली : अंमली पदार्थांचे सेवन आणि नशाखोरीला आळा घालण्यासाठी कडक कारवाईचे समर्थन करताना फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी आपल्या अपत्यांनाही आश्चर्य आणि भीती वाटेल असे विधान केले आहे.
रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीत अंमली पदार्थ आणि नशेखोरीचे समर्थन केले जाणार नाही. युवा नेता असलेल्या आपल्या मुलावर झालेलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीबाबतचे आरोप जर खरे ठरले तर, त्यालाही आपण ठार मारू, असे विधान रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी केले आहे. विरोधी पक्षात असलेल्या एका संसद सदस्याने राष्ट्रपती रॉड्रिगो ड्युटर्ट यांचा मुलगा पाओलो ड्युटर्ट (४२) याच्यावर अंमली पदार्थाच्या तस्करीचे आरोप केले होते. या सदस्याने म्हटले होते की, पाओले हे एका चीनी त्रिकूट गटाचे सदस्य आहेत. जे त्रिकूट मोठ्या प्रमाणात मेथम्फेटामाईनची तस्करी करते.
दरम्यान, आपल्यावरील आरोप पाओलो ड्युटर्टने फेटाळून लावले होते. राष्ट्रपती रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी आपल्या मुलावरील आरोपांचा उल्लेख केला नाही. पण, आपला मुलगा जरी तस्करीच्या आरोपात दोषी ठरला तर, त्यालाही आपण ठार मारू असे म्हटले आहे. राष्ट्रपती कार्यालयातील सरकारी कर्मचाऱ्यांना संबोधीत करताना रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी हे विधान केले आहे.