टॉपिंग म्हणून अख्खा तळलेला बेडूक... कोणत्या देशात आवडीनं खाल्ला जातोय पिझ्झा?

Pizza : पिझ्झा... कणकेचा बेस आणि त्यावर विविध पदार्थांचं टॉपिंग, त्यावर भरभरून चीझ आणि चव वाढवण्यासाठीचे मसाले टाकून तयार करण्यात आलेला पदार्थ.   

सायली पाटील | Updated: Nov 25, 2024, 12:33 PM IST
टॉपिंग म्हणून अख्खा तळलेला बेडूक... कोणत्या देशात आवडीनं खाल्ला जातोय पिझ्झा?  title=
Pizza Hut in China sells pizza with a deep fried frog on top internet goes crazy

Pizza : असं म्हणतात की, पिझ्झाचा जन्म इटलीमध्ये झाला आणि आजच्या घडीला संपूर्ण जगामध्ये हा पदार्थ अतिशय आवडीनं खाल्ला जाऊ लागला. विविध भाज्या, विविध पद्धतीचे टॉपिंग आणि तितक्याच विविध पद्धतीच्या चीझचा वापर करत पिझ्झा तयार केला गेला आणि तो तितक्याच आवडीनं खाल्लाही गेला. 

काळ बदलला तसतसं या पिझ्झावरील टॉपिंग्सही बदलू लागले. कैक देशांनी हा पिझ्झा त्या त्या ठिकाणच्या सर्वाधिक लोकप्रिय पदार्थांच्या टॉपिंगसह सादर केला. याचच एक उदाहरण म्हणजे, एक असा पिझ्झा, ज्यावर टॉपिंग म्हणून चक्क एक अख्खाच्या अख्खा तळलेला बेडूक दिला जातोय. भारतीय चलनानुसार या पिझ्झासाठी जवळपास 2000 रुपये मोजावे लागत असून, काहीजण हा पिझ्झा आवडीनं खातायत म्हणे. 

चीनमधील Pizza Hut नं Dungeon & Fighter: Origins या मोबाईल गेमसह कोलॅबरेशनअंतर्गत हा पिझ्झा लाँच केला आहे. पण, नेटकऱ्यांमध्ये मात्र या पिझ्झावरून एक ना अनेक चर्चांना उधाण आलं आहे. Mothership या संकेतस्थळानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तात पिझ्झा हट चीनमधील गॉबलिन पिझ्झाचा फोटो शेअर करण्यात आला जिथं तळलेला अख्खा बफेलो फ्रॉग अर्थात भलामोठा बेडूक पिझ्झावर ठेवल्याचं पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : गोव्याऐवजी 'या' देशात स्वस्तात फिरून याल 

प्री ऑर्डर केल्यासच हा पिझ्झा चीनमध्ये पिझ्झा हटकडून बनवण्यात येत असून, तो दोन फ्लेवर्समध्ये बनवला जात आहे. सोशल मीडियावर सध्या या पिझ्झाचा आणि त्याच्या विचित्र टॉपिंगचा फोटो शेअक केला जात असून, प्रत्यक्षात या पिझ्झाची चव घेतलेल्यांनी मात्र हा पिझ्झा जाहिरातीत वेगळा आणि प्रत्यक्षात वेगळाच दिसत असल्याचं म्हटलं आहे. 

मुळात अनेक फूड चेन रेस्टॉरंट किंवा पिझ्झा हटसम फूड चेन विविध देशांमध्ये त्या त्या देशातील लोकप्रिय खाद्यपदार्थांवर भर देत अगदी त्याच प्राधान्यानं त्यांच्या पदार्थांमध्ये बदल करत असतात. अमेरिका आणि न्यूयॉर्कमध्ये मिळणारा पिझ्झा आणि भारतातील पिझ्झा ज्याप्रमाणं वेगळा असतो, अगदी त्याचप्रमाणे चीनमधील हा पिझ्झाही प्रचंड वेगळा असल्याचं म्हटलं जात आहे.