वॉशिंग्टन : संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या या संकटाचा फटका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही बसला. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर तातडीनं त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आले. प्रकृतीत काही अंशी सुधारणा दिसताच ट्रम्प यांना रुग्णालयातून रजाही देण्यात आली होती. व्हाईट हाऊनसमध्येच त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. ज्यानंतर आता त्यांच्या कोरोना संसर्गाबाबतची मोठी माहिती समोर आली आहे.
ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील रॅलीपूर्वीच ही माहिती डॉक्टरांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये उपचारांनंतर त्यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याचं स्पष्ट झालं आहे. 'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्यानं करण्यात आलेल्या कोरोना टेस्टच्या अहवालाबाबत तुम्ही विचारणा केली होती. त्याचबद्दल मी माहिती देत आहे की त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे', असं संबंधित डॉक्टरांनी सांगितलं. शिवाय त्यांना आता कोरोना संसर्गाची भीती नसल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.
सीन कॉनले या फिजिशियनच्या माहितीनुसार सातत्यानं ऍंटीजन टेस्ट, क्लिनिकल आणि लेबॉरेटरी डेटा, RNA आणि PCR यामध्ये वायरल रेप्लिकेशन कमी आढळून आलं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता अवघ्या तीन आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. यादरम्यानच्या काळात विरोधात उभ्या असणाऱ्या जो बायडन यांना डोनाल्ड ट्रम्प मागे टाकताना दिसत आहेत. यातच कोरोनावर मात करत ते आता पुन्हा एकदा नव्या जोमानं प्रचारात सहभागी होताना दिसतील. सोशल मीडियावरही त्यांची सक्रियता वाढल्याचं पाहायला मिळत आहे.