बीजिंग : China Taiwan Latest News: तैवान आणि चीनमधील युद्धाचा (Taiwan China War) भडका उडण्याची शक्यता आहे. जगात आता तिसऱ्या युद्धाची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरुच आहे. गेले तीन महिने हे युद्ध सुरुच आहे. आता तैवान आणि चीन यांच्यात युद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण तैवानने आपल्या सीमेजवळ 21 चीनी लढाऊ विमाने आणि 5 नौदल जहाजांचा माग काढला आहे. चिनी लढाऊ विमाने आणि नौदलाच्या जहाजांनीही तैवान सामुद्रधुनी मध्य रेषा ओलांडली. त्यामुळे या भीतीत भर पडली आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले की, शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांनी चिनी लढाऊ विमाने आणि नौदलाच्या जहाजांचा ट्रॅक केले आहे. त्यामुळे चीन तैवानवर हल्ला करण्याची तयारी करीत असल्याचे स्पष्ट जाले आहे. अमेरिकेने तैवान प्रश्नी नाक खुपल्याचे चीनचे म्हणणे आहे. त्यामुळे तैवानला धडा शिकविण्यासाठी आणि अमेरिकेला जबर बसावी, म्हणून चीन टोकाचे पाऊल उचलू शकतो, अशी शक्यता आहे.
तैवानच्या लष्कराचे म्हणणे आहे की, पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सच्या 8 लढाऊ विमानांनीही तैवान स्ट्रेट सेंट्रल लाइनमध्ये घुसखोरी केली. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने असेही म्हटले आहे की त्यांची कॉम्बॅट एअर पेट्रोल (सीएपी), नौदलाची जहाजे आणि हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहेत.
अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीन आक्रमक झाला आहे. चीनने तैवानच्या सीमेभोवती त्यांच्या हालचाली वाढवल्या आहेत. यापूर्वी तैवान सीमेजवळ 51 चिनी लढाऊ विमाने दिसली होती.
विशेष म्हणजे, रविवारी अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तैवानला भेट दिल्यानंतर चीन आणि तैवानमधील तणाव वाढला. त्यानंतर चिनी आर्मी पीपल्स लिबरेशन आर्मीकडून सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली, ज्यामध्ये पेंगू बेटावर चीनची जेट विमाने दाखवण्यात आली. चीन तैवानच्या प्रवेशद्वारावर बसला आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तैवान वायुसेनेच्या व्हाईस चीफ ऑफ स्टाफने चीनचा दावा फेटाळून लावला.
चीनसोबतच्या तणावादरम्यान तैवान आपली क्षमता दाखवण्यासाठी लष्करी सरावही करत आहे. चीनचे राजकीय नियंत्रण नाकारुन बीजिंगला विरोध करण्यासाठी तैवान लष्करी सराव करत आहे. बुधवारी, त्याने तैवानच्या सागरी आणि हवाई क्षेत्रात चिनी क्षेपणास्त्रे डागल्यानंतर काही दिवसांनी हुआलिनच्या आग्नेय काउंटीमध्ये लष्करी कवायती केल्या.