वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सुनावलं आहे. ट्रंप यांनी म्हटलं की, पाकिस्तानने अमेरिकेसाठी केलं तरी काय आहे. त्यांनी फक्त दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. ट्रंप यांनी रविवारी पाकिस्तानला आर्थिक मदत बंद केल्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. यावर्षी अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारी 2 बिलियन डॉलरची लष्करी मदत बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
ट्रंप यांनी पुन्हा एकदा ओसामा बिन लादेनच्या नावाचा संदर्भ देत पाकिस्तानच्या धरतीवर दहशतवाद कसा सक्रीय आहे. याबाबत त्यांनी उल्लेख केला. लादेन पाकिस्तानातच होता आणि अमेरिकेची मदत घेत होता. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी दहशतवाद्यांना सुरक्षित आधार देणाऱ्या पाकिस्तानवर टीका केली. ट्रंप यांनी म्हटलं की, पाकिस्तान त्या लोकांना आश्रय देतो आहे जे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या नागरिकांची हत्या करत आहेत.
ट्रंप यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या इंटरव्यूमध्ये म्हटलं की, 'ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये राहत होता. आणि अमेरिका पाकिस्तानला मदत करत होती.' रविवारी प्रदर्शित झालेल्या या मुलाखतीत ट्रंप यांनी म्हटलं की, 'आम्ही पाकिस्तानला एका वर्षाला जवळपास 1.3 बिलियन डॉलरची मदत करत होतो. पण आता त्यांनी मदत नाही मिळणार. मी ही मदत यासाठी बंद केली कारण त्यांनी आपल्यासाठी एक छोटं कामही केलेलं नाही.' ज्यावेळी लादेन मारला गेला तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याने जोरदार टीका केली होती.