CEO पराग अग्रवाल ट्विटरच्या डीलमुळे चिंतेत, म्हणाले- कंपनी कोणत्या दिशेने जाईल माहित नाही

Parag Agarwal on Twitter Deal : ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कर्मचार्‍यांना म्हटले की, आताची डील पूर्ण करण्यासाठी तीन ते सहा महिने लागतील. ते म्हणाले, 'या काळात आम्ही पूर्वीप्रमाणेच ट्विटरचे कामकाज पाहत राहू.'

Updated: Apr 26, 2022, 03:07 PM IST
CEO पराग अग्रवाल ट्विटरच्या डीलमुळे चिंतेत, म्हणाले- कंपनी कोणत्या दिशेने जाईल माहित नाही title=

नवी दिल्ली : Parag Agarwal on Twitter Deal :  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर कंपनीचे कर्मचारी चांगलेच चिंतेत आहेत. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले की, या मोठ्या डीलनंतर कंपनी कोणत्या दिशेने जाईल हे मला माहीत नाही. एलन मस्क यांनी ट्विटरला 44 बिलियन डॉलर्सला विकत घेतले आहे. कंपनी कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कर्मचार्‍यांना म्हटले की, आताची डील पूर्ण करण्यासाठी तीन ते सहा महिने लागतील. ते म्हणाले, 'या काळात आम्ही पूर्वीप्रमाणेच ट्विटरचे कामकाज पाहत राहू. हे मान्य करणे महत्त्वाचे आहे की, जे काही घडत आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत. हा करार पुढील तीन ते सहा महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे'.

अग्रवाल म्हणाले की, 'आम्ही कंपनी चालवताना ज्याप्रकारे निर्णय घेतो, जे सकारात्मक बदल करतो - ते आमच्यावर अवलंबून असेल आणि आमच्या नियंत्रणात असेल.' दरम्यान, ट्विटर कर्मचार्‍यांच्या भवितव्याबद्दल आता अनिश्चितता आहे,  मस्क यांनी ट्विटर घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कपातीची शक्यता वर्तवली आहे.

Twitter सह मस्क यांच्या योजना?

ट्विटरबाबत मस्क यांची योजना काय आहे. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की, कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी मस्क कोणाची निवड करतील याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. किमान करार पूर्ण होईपर्यंत अग्रवाल कायम राहण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार, स्टाफ मीटिंगमध्ये अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली. 'एकदा करार पूर्ण झाल्यानंतर ही कंपनी कोणत्या दिशेने जाईल. हे आम्हाला माहित नाही.'

14 एप्रिल रोजी खरेदीची ऑफर

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ट्विटर ही खाजगी कंपनी बनेल. मस्क यांनी 14 एप्रिल रोजी ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली.. 

ट्विटरच्या बोर्डाने सोमवारी त्यांच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली आणि शेअरधारकांनीही परवानगी दिली.