Russia Ukrain War : युक्रेनचे (Ukaraine) अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्या नावाची यंदाच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी (nobel peace prize) शिफारस होण्याची शक्यता आहे. युरोपियन नेत्यांच्या समितीनं नोबेल पुरस्काराच्या नामांकनाची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्याची विनंती केलीये. झेलेन्स्की आणि युक्रेनियन जनतेसाठी नोबेल कमिटीनं मुदत वाढवावी, असं युरोपियन नेत्यांनी म्हटलंय.
2022च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी आतापर्यंत 251 व्यक्ती आणि 92 संस्थांचे अर्ज आले आहेत. रशियाच्या (Russia) हल्ल्यानंतरही देश सोडायला नकार देणारे आणि देशवासियांसोबत खांद्याला खांदा लावून लढणारे झेलेन्स्की सध्या युरोप-अमेरिकेच्या गळ्यातला ताईत झालेत. त्यामुळे नोबेलसाठी आता त्यांचं नाव पुढे करण्यात आलंय.
युरोपियन नेत्यांनी समितीला नोबेल शांतता पुरस्कारासाठी 2022 ची नामांकन प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास आणि नामांकनांवर पुनर्विचार करण्यास सांगितलं आहे. यंदाचा नोबेल पुरस्कार 3 ते 10 ऑक्टोबर दरम्यान जाहीर होणार आहे.
युक्रेनच्या पश्चिम भागात हल्ला
दुसरीकडे, रशिया-युक्रेन युद्धाला आज 22 दिवस झाले आहेत. रशियन सैन्य आता युक्रेनच्या पश्चिमेकडील प्रदेशांवर हल्ले करत आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांनी अनेकवेळा वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेतल्या, मात्र अद्यापपर्यंत कोणताही ठोस निकाल समोर आलेला नाही. त्यामुळे युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये निर्वासितांचा ओघ वाढला आहे.
UNSC बैठक पुढे ढकलली
रशिया-युक्रेन युद्धाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) शुक्रवारी तातडीची बैठक झाली. बैठकीत युक्रेन, अमेरिका आणि ब्रिटनच्या प्रतिनिधींनी रशियावर युक्रेनमधील लोकसंख्या असलेल्या भागांना आणि वैद्यकीय सुविधांना लक्ष्य केल्याचा आरोप केला, त्यानंतर बैठक पुढे ढकलण्यात आली.