प्रियंका चोपडाला हटवण्याची मागणी करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राचा ठेंगा

पाकिस्तानला आणखी एक झटका

Updated: Aug 23, 2019, 05:55 PM IST
प्रियंका चोपडाला हटवण्याची मागणी करणाऱ्या पाकिस्तानला संयुक्त राष्ट्राचा ठेंगा title=

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. भारतीय सैन्यदलाचं कौतूक करणाऱ्या प्रियंका चोप्राला युनिसेफच्या सदिच्छादूत म्हणून हटवावं, ही पाकिस्तानची मागणी फेटाळण्यात आली आहे. युनिसेफचे सदिच्छादूत त्यांचं वैयक्तिक मत निश्चित मांडू शकतात, असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गटर्स यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. त्यांची मतं ही युनिसेफची मतं असलीच पाहिजेत असं नाही. मात्र ते जेव्हा युनिसेफच्या वतीनं बोलत असतील तेव्हा त्यांनी निष्पक्ष राहणं अपेक्षित असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केलं आहे. 

प्रियंकाला हटवण्याबाबत पाकिस्तानच्या राजदूतांनी पत्र पाठवलं होतं. मात्र भारतावर आणि भारतीयांवर कुरघोडी करण्याचा इम्रान खान यांचा आणखी एक प्रयत्न फसला आहे.

जम्मू-कश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचं मानसिकता बिघडली आहे. एका कार्यक्रमात एका पाकिस्तानी महिलेने प्रियंका चोपडाच्या ट्विटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या एअर स्ट्राईकनंतर प्रियंकाने 'जय हिंद, भारतीय सेना' असं म्हटलं होतं. 

पाकिस्तानी महिलेने म्हटलं होतं की, संयुक्त राष्ट्रातील सदिच्छादूत असताना असं नाही म्हटलं पाहिजे. यानंतर पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन मजारी यांनी यूनिसेफ (UNICEF)ला पत्र लिहून प्रियंका चोपडाला हटवण्याची मागणी केली होती. पण संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी ही मागणी फेटाळून लावली.