श्रेयस देशपांडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : कोणत्याही व्यक्तीला देवत्व दिलं की त्याच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या दंतकथा आणि अफवा या आता नेहमीच्याच झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू आणि मिस्टर ३६० अशी ज्याची ओळख आहे तो एबी डिव्हिलियर्सही याला अपवाद ठरला नाही. एबी डिव्हिलियर्स हे नाव जेव्हापासून क्रिकेटमध्ये उदयास आलं तेव्हापासूनच त्याच्याबद्दलचा महिमा सोशल नेटवर्किंगवर आणि काही वेळा माध्यमांमध्येही सांगण्यात आला. एबीनं घेतलेल्या निवृत्तीनंतर आता पुन्हा अशा कथांचं पीक आलं आहे.
एबी क्रिकेटप्रमाणेच इतर खेळांमध्येही कसा यशस्वी होता, असे मेसेज आणि बातम्या तुम्ही नेहमीच ऐकल्या असतील. पण या बातम्यांमध्ये नेमकं किती तथ्य आहे हे एबीचं आत्मचरित्र वाचल्यावर लक्षात येतं. खुद्द एबी डिव्हिलियर्सनं त्याच्या आत्मचरित्रामध्ये याबाबत खुलासा केला आहे. 'एबी द ऑटोबायोग्राफी' या आत्मचरित्रात या अफवांवर एबीनं भाष्य केलं आहे.
एबी डिव्हिलियर्स हा स्विमिंग आणि अॅथलेटिक्समध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय टीमकडून खेळला असून त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. टेनिस आणि बॅडमिंटन या खेळांमध्येही एबीनं उत्तुंग कामगिरी केली आहे. एबी दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनिअर रग्बी टीमकडूनही खेळला आहे. तसंच गोल्फ हॅण्डिकॅपमध्ये तो स्क्रॅच खेळाडू आहे, अशा सुरस कथा ऐकायची क्रिकेट रसिकांना सवयच झाली आहे.
या सगळ्या अफवांचा बुरखा एबीनं त्याच्या आत्मचरित्रात अक्षरश: टराटरा फाडला आहे. हायस्कूलमध्ये मी फक्त एक वर्ष हॉकी खेळलो, पण राष्ट्रीय टीममध्ये माझी कधीच निवड झाली नाही. तसंच निवड व्हायच्या जवळही मी कधीही आलो नव्हतो. फूटबॉलची एकही मॅच मी खेळलेलो नाही. शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये मी फक्त फूटबॉलला किक मारायचो. क्रिकेट खेळत असताना सराव म्हणून आम्ही फूटबॉल खेळायचो. दक्षिण आफ्रिकेकडून मी कधीच रग्बी खेळलो नाही, त्यामुळे कर्णधार व्हायचा प्रश्नच नाही. शाळेत असताना मी कधी बॅडमिंटनला हातही लावला नव्हता. माझ्या आयुष्यात मी फक्त एकदाच बॅडमिंटन खेळलो तेही दक्षिण आफ्रिकेचा माजी विकेट कीपर मार्क बाऊचर बरोबर. १५ वर्षांचा असेपर्यंत मी गोल्फ खेळायचो पण त्यानंतर तेही सोडून दिलं, आणि क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं, असं एबी म्हणाला.
इंटरनेटवर माझ्याबद्दल अशाप्रकारच्या गोष्टी पसरवण्यात आल्या. तसंच मी सूपरमॅन असून सगळेच खेळ येणारा ऑल राऊंडर असल्याची माझी प्रतिमा बनवण्यात आली. या आत्मचरित्रातून माझ्याबद्दलचं सत्य समोर येईल, असं एबीनं त्याच्या आत्मचरित्रात लिहीलं आहे.