'भारताविरुद्ध हारलो तरी पाकिस्तानी चाहते TV फोडणार नाही, कारण...'; स्वत:च्याच देशाची उडवली खिल्ली

Champions Trophy India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सामान्यपणे पाकिस्तानी चाहत्यांनी टीव्ही फोडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर येतात. याच पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आलं आहे.

Updated: Feb 23, 2025, 08:41 AM IST
'भारताविरुद्ध हारलो तरी पाकिस्तानी चाहते TV फोडणार नाही, कारण...'; स्वत:च्याच देशाची उडवली खिल्ली
स्वत:चं उडवली स्वत:च्या संघाची खिल्ली (प्रातिनिधिक फोटो)

Champions Trophy India Vs Pakistan: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बशीत अलीने मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील आपल्या संघाला घरचा आहेर दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेमध्ये भारताविरूद्धच्या सामन्याआधीच बशीत अली यांनी पाकिस्तानच्या संघाला टोला लगावला. रविवारी दुबईच्या मैदानात होणाऱ्या या सामन्याआधी बशीत अली यांनी पाकिस्तानमध्ये भारताविरूद्धचा सामन्याच्या निकालानंतर टीव्ही फुटणार नाहीत असं विधान केलं आहे. मात्र हे विधान त्यांनी उपरोधिकपणे केलं आहे.

हारलो तरी टीव्ही फोडणार नाही

बशीत यांनी भारताविरूद्धचा सामना एतर्फी ठरला आणि पाकिस्तानचा संघ पराभूत झाला तर पाकिस्तानी चाहते त्यांचे टीव्ही सेट फोडणार नाहीत. यामागे काही भावनिक कारण नसून प्रॅक्टीकल कारण आहे. सध्याची पाकिस्तानची आर्थिक स्थिती पाहता पाकिस्तानी चाहते आता एकतर्फी सामन्यात संघ पराभूत झाला तरी टीव्ही सेट फोडणार नाहीत, असं विधान बशीत यांनी केलं आहे. पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टीकवून ठेवण्यासाठी भारताविरूद्धचा सामना जिंकणं आवश्यक आहे. असं असतानाच बशीत यांनी हे विधान केलं आहे. 

सर्वात मोठा उलटफेर

"जर एकतर्फी सामना झाला तरी टीव्ही फुटणार नाहीत. कारण पाकिस्तानची आर्थिक स्थिती चिंताजनक असून इथे महागाई फारच वाढली आहे. आता केवळ तोंडाने व्यक्त होऊ," असं बशीत अली यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे. या विधानामधून बशीत यांनी पाकिस्तानी क्रिकेट आणि अर्थव्यवस्थेवर मिश्कील भाष्य केल्याचं दिसत आहे. पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूने पाकिस्तानने भारताला पराभूत केलं तर तो मालिकेमधील सर्वात मोठा उलटफेर ठरु शकतो, असंही म्हटलं आहे. भारतीय संघ पाकिस्तानला पराभूत करेल असं आपल्याला वाटतं असल्याचंही बशीत म्हणाले. 

नक्की वाचा >> '...तर रोहित 60 बॉलमध्येच शतक झळकावेल'; Ind Vs Pak मॅच आधी युवराजचं भाकित

सुमार दर्जाचं क्रिकेट

"भारत हा सामाना जिंकेल असं वाटतंय. याबद्दल काही शंका नाही की भारत अधिक सरस आहे. माझ्या मते पाकिस्तानने भारताला पराभूत केलं तर तो स्पर्धेतील मोठा उलटफेर ठरेल. कारण सध्या आमचा संघ अगदीच सुमार दर्जाचं क्रिकेट खेळत आहे," असं बशीत यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> '...म्हणून पाकिस्तानने भारताविरूद्धचा सामना जिंकावा'; माजी भारतीय क्रिकेटरनं सांगितलं कारण

पाकिस्तानी फलंदाजांकडून सुमार कामगिरी

याच व्हिडीओमध्ये बशीत अली यांनी पाकिस्तानी संघाच्या फलंदाजांवर निशाणा साधला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळताना पाकिस्तानी फलंदाजांचा दृष्टीकोन योग्य नसल्याचं म्हटलं आहे. फकर जमान जखमी झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळेच फलंदाजीचा विचार केला तर पहिल्या पाचही फलंदाजांची कामगिरी चिंतेत टाकणार असल्याचं बशीत यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी फलंदाजांना धावगती वाढवता येत नाही. त्यांना वेगाने धावा काढायला जमत नाही, असं या 54 वर्षीय माजी क्रिकेटपटूने म्हटलंय.