'तो ड्रग्स तर...'; वर्षाला 5 चित्रपट करण्यावरून अक्षयला ट्रोल करणाऱ्यांना परेश रावलचं सडेतोड उत्तर

Paresh Rawal on Akshay Kumar : परेश रावल यांनी अक्षय कुमार एका वर्षात 4-5 चित्रपट का करतो आणि त्यावरून त्याला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 23, 2025, 10:13 AM IST
'तो ड्रग्स तर...'; वर्षाला 5 चित्रपट करण्यावरून अक्षयला ट्रोल करणाऱ्यांना परेश रावलचं सडेतोड उत्तर
(Photo Credit : Social Media)

Paresh Rawal on Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा एका वर्षात चार-पाच चित्रपट करतो. तो काय पाहून चित्रपट निवडतो यावरून देखील अनेक लोक त्याला ट्रोल करताना दिसतात. त्यामुळेच त्याचे चित्रपट एकामागे एक फ्लॉप होतात असं म्हणतात. गेल्या बऱ्याच दिवसांपासून अक्षयचा एकही चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत नव्हता. असं असलं तरी त्यानं ते सोडलं नाही आणि तो चार-पाच चित्रपट करत राहिला. या सगळ्यावर आता अभिनेता परेश रावलनं अक्षय कुमारला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

परेश रावल यांनी नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत परेश रावल यांनी अक्षयला दरवर्षी 4-5 चित्रपट करण्यावरून ट्रोल करण्यात आलं आहे. तर त्यावर ते म्हणाले, जर तो इतके चित्रपट करतोय तर तुम्हाला काय अडचण आहे? लोक त्याच्याकडे चित्रपट घेऊन जातात? हो की नाही? एक निर्माता म्हणून मी कोणत्या अभिनेत्याला तेव्हाच साइन करेन जेव्हा मी गुंतवलेल्या पैशांचं काही तरी होऊ शकतं असं मला वाटत असेल तरच करेन ना. 

परेश रावल पुढे म्हणाले, त्याला काम करायला आवडतं. तो स्मगलिंग तर करत नाही ना. दारूचा पुरवठा करत नाही ना. ड्रग्स तर घेत नाही, जुगार तर खेळत नाही ना. तो काम करतो, त्यानं कित्येक लोकांना काम मिळतं. ते पण बघा ना तुम्ही. 

दरम्यान, अक्षय कुमारच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 2021 मध्ये 'सूर्यवंशी' हा चित्रपट आला होता. त्यानंतर आतापर्यंत त्याचे एकूण 14 चित्रपट हे फ्लॉप ठरलेत. तर त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'स्काई फोर्स' या चित्रपटाचं सगळ्यांकडून कौतूक करण्यात येत आहे. 

परेश रावल यांनी नंतर अक्षय कुमारसोबत असलेल्या मैत्रीवर वक्तव्य केलं. त्यांनी अक्षयला प्रामाणिक आणि मेहनती म्हटलं आहे. त्यासोबत त्यांनी सांगितलं की दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची असुरक्षेची भावना नाही. परेश रावल म्हणाले, 'तो जे करतो, ते मी करू शकत नाही. मग त्यात अ‍ॅक्शन असो किंवा मग चांगलं दिसणं. तो फक्त मेहनती नाही, तर प्रामाणिक देखील आहे. जेव्हा तो तुमच्याशी बोलतो तेव्हा त्याचा कोणताही अजेंडा नसतो. तो अगदी फॅमिली मॅन आहे. त्याच्याशी बोलणं त्याच्यासोबत राहायला चांगलं वाटतं.'

परेश रावल आणि अक्षय कुमारचा 'भूत बंगला' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत तब्बू असरानी आणि वामिका गब्बी देखील असणार आहे.