सिद्धार्थ कसबे
लेणी अभ्यासक, जुन्नर
मी आणि माझे पुण्यातील मित्र पंचशील सोनवने, अनिल जगताप, विलास माने दिनांक 13 मार्च 2016 रोजी रविवारी सकाळी 9.०० वाजता आळेफाटा या ठिकाणी भेटलो. आम्ही सर्व जण लेणीचे अध्ययण करण्यासाठी खूप उत्सुक होतो. आळेफाटा येथील जय शंकर या हॉटेलमध्ये सकाळची न्याहरी करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. नगर कल्याण महामार्गावरील 'ओतूर' मार्गे आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत लेण्याद्री येथील लेणी समुहाचा अभ्यास करण्यासाठी सकाळी 11.00 वाजता लेण्याद्री इथं पोहचलो.
जुन्नर तालुक्यात सातवाहन राजांनी सुमारे 2200 वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या डोंगरामध्ये बौद्ध भिख्खूंसाठी लेणी कोरुन ठेवल्या. त्यापैंकी लेण्याद्री हा एक समूह... जुन्नर शहरापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर गोळेगाव येथे या लेणी आहेत. आम्ही सर्वांनी लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रथम डोंगर चढायला सुरूवात केली. डोंगराच्या पायथ्याजवळ भारतीय पुरातत्व खात्याने लेण्यांची माहिती देणारी 'कोणशिला' लावली आहे. ती वाचून आम्ही वर चढायला सुरुवात केली. डोळ्यांसमोर कोरीव लेण्या आम्हाला खुणावत होत्या. लेण्यांच्या पायऱ्या चढत असताना आम्हाला खूप माकडे दिसली. त्या माकडांचे हावभाव पाहून मनामध्ये विचार येऊन गेला की आपणही पूर्वी माकडच होतो. पायथ्याशी असणाऱ्या कोणशिलावरील लेखात 'कपिचित डोंगर' (कपिचित म्हणजे माकड) म्हणून हे ठिकाण सातवाहन कालापासून प्रचलित आहे.
आम्ही लेण्यांजवळ पोहचलो आणि लेणीचे कोरीव काम पाहून थक्क झालो. लेणी द्वारातून आतमध्ये भव्य स्तूप आहे. स्तुपाच्या द्वाराच्या वरच्या बाजुला 'ब्राम्ही' लिपीमधे एक लेख कोरला आहे. त्यामधे कल्याण येथील सोनाराच्या मुलाने या लेणीसाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. हे वाचून आम्ही स्तुपाजवळ गेलो. महाराष्ट्रातील एक सुंदर कोरीव स्तूप अशी त्याची ख्याती आहे. आकाश हे अर्ध सत्य आहे आणी पृथ्वी हे एक अर्ध सत्य... दोन्ही मिळून जे पूर्ण सत्य निर्माण होते ते स्तुपाच्या माध्यमातून 'हिनयान' लोकांनी आपल्या समोर कोरुन ठेवले आहे. स्तुपासमोर अष्टकोणी खांब असून त्यावर सिंह आणि हत्ती यांची शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पवित्र बुद्ध अस्थिवर सम्राट अशोकाने भारतामधे 84,000 स्तुपांची निर्मिती केली आणि बौद्ध भिख्खू आणि उपासक या स्तुपांची पूजा करू लागले. त्यापैंकी लेण्याद्रीमधील हा एक स्तूप (वंदामी चेतियं सब्ब)... त्यानंतर बाजूला एका भव्य आशा सभागृहात आम्ही प्रवेश केला. एवढा मोठा सभागृह पाहून मन थक्क झाले. यामध्ये आम्हाला 20 'शुन्यागर' दिसले (शुन्यागर म्हणजे एका व्यक्तिला ध्यानासाठी कोरलेली खोली) समोरच्या भिंतीमध्ये जे 'शुन्यागर' आहेत त्यातील दोन खोल्या तोडून आठव्या शतकात गणपतीची स्थापना करण्यात आली. हिंदू धर्मातील अष्टविनायकामधील एक गणपति म्हणून हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या सभागृहात त्याकाळी जे अरहंत भिक्षू होते त्यांची प्रवचणं ऐकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात धम्म उपासक, राजे उपस्थित राहत. त्यांच्या सुमधूर धम्मवाणीने हा परिसर मंगलमय वातावरणामध्ये परिवर्तित होत असेल याची प्रचिती आली.
लेण्याद्रीचा निरोप घेऊन पुढील अभ्यासासाठी सातवाहन कालीन 'नाणेघाटा'कडे भरधाव वेगाने आमची कार जुन्नरच्या दिशेने सुरु झाली. समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान - शिवनेरी किल्ला आमच्या दृष्टीस पडला. शिवनेरीला मागे टाकत आमची कार नाणेघाटाकडे धाव घेत होती. माझे मित्र नाणेघाटाकडे प्रथमच निघाले होते. त्यामुळे त्यांच्या मनात त्याबद्दल कुतूहल होतं.
आम्ही नाणेघाटाजवळ पोहचलो होतो 'नानाचा अंगठा' आम्हाला सातवाहनकालीन जीवनाकडे घेऊन गेला. विश्वातील एकमेव राजे ज्यांनी सलग 450 वर्ष शांतीपूर्वक राज्य केलं. जुन्नर ही सातवाहनांची राजधानी... प्राचीन कल्याण ते पैठण हा त्यावेळचा दळण-वळणाचा मार्ग... या मार्गावर नाणेघाट येतो. तिथे आम्हाला एक मोठा दगडी रांजण दिसला. यात त्यावेळेस कल्याण बंदरावरुन येणारा माल हा नाणेघाटाच्या पायथ्यावरुन घोडे, खेचरामार्फत वर नेत असत. तिथे विसाव्यासाठी सातवाहन राजांनी लेणी कोरलेल्या आहेत. लेण्यांत सातवाहनांचे शीलालेख कोरलेले दिसतात. काही शिलालेख हे अर्धवट अवस्थेत आहेत. मालाची वाहतूक होत असे त्याचा महसूल कर नाण्यांच्या रुपात दगडी रांजनात जमा करत असत. एका दिवसात तो रांजन नाण्यांनी भरत असे. त्यामुळे या ठिकाणाला 'नाणेघाट' असे नाव पडले असावे.
निसर्गाने नटलेला नानेघाट आणि सातवाहन राजांचे उपकार मनात ठेऊन आम्ही सर्व जुन्नरच्या दिशेने निघालो. जुन्नरमध्ये आल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर जवळच खानापूरच्या अम्बा-अम्बिका लेणी गटातील भीमाशंकर लेणी पाहन्याचे आम्ही ठरवले.
भीमाशंकरच्या पायथ्याला कार पार्क करून आम्ही लेण्यांकडे निघालो. लेण्यांपर्यंत पोहचायला जंगलातून जावे लागते. लेणी मार्ग बऱ्यापैंकी कठिण आहे. पुरातत्व खात्याने कोणताही दिशादर्शक फलक लावलेला नाही. जंगलातून वाट काढत आम्ही लेण्यांजवळ पोहचलो. लेण्यांच्या वरच्या बाजुला आम्हाला मोठे मधमाशांची पोळे दिसले. ते पाहून आम्ही खबरदारी म्हणून कोणीही बोलायचं नाही... फोटो काढायचे नाहीत, असे ठरवले. कारण मागील वर्षी एका पोर्णिमेला माझ्या काही मित्रांवरही मधमाशांचा हल्ला झाला होता. आम्ही लेणी द्वारातून आत शांतपणे प्रवेश केला.
समोरच आम्हाला स्तुपात अर्धवट बुद्धांची मूर्ती कोरलेली दिसली. या अर्धवट शिल्पामागे काय कारण असावे, असा एक विचार मनात आला. सम्राट अशोकाचा नातू ब्रहदत याची पुष्यमित्र श्रुन्गाने जी कपटाने हत्या केली आणि त्यानंतर बुद्ध धम्माचा जो पाडाव सुरु झाला त्या कारणानं हे शिल्प अर्धवट राहिले असेल कदाचित असे समजून आम्ही लवकर खाली यायला निघालो.
खाली येत असताना अचानक मागील बाजूने मधमाशांनी आमच्यावर हल्ला केला. मी सहकार्यांना अगोदर सूचना दिलीच होती की जर माशांनी हल्ला केलाच तर जमिनीवर झोपावं. त्यामुळे आम्ही सर्व जण जमिनीवर झोपलो. पण खूप मधमाशा दिसल्यानंतर पळायचं आम्ही ठरवलं. आम्ही जसे पळायला लागलो तशा आमच्या मागे मधमाशा येऊ लागल्या आणि त्यांनी आमच्यावर हल्ला केला. कोण, कुठे आहे हे आम्हाला कोणालाच कळत नव्हतं. प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून पळत होता. आम्ही कार पार्क केलेल्या ठिकाणी आलो. माशा चावतच होत्या. मी कार खाली जाऊन झोपलो. माशा खाली येऊन चावत होत्या. मी खूप घाबरलो होतो. बाजूने मला अनिल जगताप जाताना दिसले. माझ्या मनात पंचशील सोनावणेंचा विचार आला. कारण ते जास्त पळू शकत नव्हते. त्यांना वाचवण्यासाठी मी रोडच्या बाजूला असणाऱ्या घरांतील लोकांना मदतीसाठी विनवणी करत होतो. परंतु कोणीही जवळ यायला तयार नव्हते. कारण मधमाशा अंगाशी चिकटलेल्या होत्या.
मी ठरवले की जुन्नर गावात जाऊन मदत मागावी. मधमाशा खूप चावल्या होत्या, पण तशाही अवस्थेत जुन्नरच्या सरकारी दवाखान्यात पोहचलो तिथे अगोदरच जगताप पोहचले होते. आम्ही नर्समार्फत पंचशील सोनवणे आणि विलास माने हे दोघे अजून आले नाहीत, अशी माहिती पोलिसांपर्यंत पोहचवली. आम्हाला अॅडमिट करण्यात आले होते. संपूर्ण शरीर मधमाशांच्या काट्यांनी भरले होते. खूप वेदना होत होत्या. तेवढ्यात पंचशील सर आल्याचे आमच्या मित्रांनी सांगितले. त्यांची हालत खूपच नाजूक होती. मधमाशांचे डंख पूर्ण शरीरावर होते. त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या घरी फोन करुन माहिती दिली होती. त्याच रात्री पंचशील सरांना त्यांच्या कुटुंबीयांनी पुण्याला हलवलं. जगताप आणि माने सरही पुण्याला गेले. पंचशील यांच्यावर एक महिना उपचार सुरू होते. सुदैवानं आज सर्व जण सुखरुप आहेत.
पण, लेणी म्हणजे काय? हे लेणी पाहायला गेल्याशिवाय समजत नाही. 2500 वर्षांपूर्वी भारतात शिल्प कला किती सर्वोच्च स्थितिमध्ये होती, हे लेण्यांमधील शिल्पकला पाहिल्यावर समजतं. पुरातत्व खात्याने या आपल्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या लेणी, गड, किल्ले या वास्तूंकडे लक्ष द्यावं, हीच एक अपेक्षा... संपूर्ण माहिती आणि खबरदारी घेऊन एकदा तरी जुन्नरमधील सातवाहनकालीन लेण्यांना एकदा तरी अवश्य भेट दया...
(नोट : लेखातील सर्व मतं लेखकाची वैयक्तिक आहेत)