प्रविण दाभोळकर, झी मीडिया, मुंबई : बैलगाडा स्पर्धांवर बंदी आल्यानंतर आता कोकणात नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली बैलांच्या जीवाशी खेळ सुरु झालाय. स्पर्धा तीच जीवघेणी..फक्त 'नांगरणी' या पवित्र शब्दाचा आधार घेत या स्पर्धांच फॅड आता कोकणात पसरत चाललंय. देवरूख/संगमेश्वरमध्ये स्पर्धेदरम्यान बैल उधळून एकजण जखमी झाल्याची घटना समोर आल्यानंतर तरी या घटनेचे गांभीर्य नागरिकांनी लक्षात घ्यायला हवं. मोजक्या उत्पन्नातही समाधानी शेतकरी अशी ओळख असणाऱ्या कोकणच्या संस्कृतीला अशा स्पर्धांमुळे आपण बदनाम करतोय याच भानही स्पर्धेक आणि आयोजकांना राहत नाहीय.
सध्या अनेकांच्या मोबाईलमध्ये बैलांच्या स्पर्धांचे व्हिडीओ दिसतायत. आपण किती दूर या स्पर्धांसाठी गेलो, किती गर्दी होती वगैरे हे लोक अभिमानाने सांगतात. अनेकजण हे व्हिडीओ आपल्या व्हॉट्सअप, इन्स्टा स्टोरी म्हणून ठेवतायत. मग स्पर्धा कुठे झाली ? कशी झाली ? याबद्दल चर्चा आणि सांगणाऱ्याच्या गझालीही सुरु होतात. पण हे कौतूक आपण नक्की कशाचं करतोय हे अद्याप त्यांना कळत नाहीय. या सर्वामुळे आयोजकांना स्पर्धा भरवण्यासाठी आयत आंदण मिळतय.
सुरक्षेची काळजी घेतो या नावाखाली चार बॅरीगेट्स टाकले, लोकांना लांब उभ केलं की स्पर्धेच्या आयोजकांचं काम संपत. जणू काही बैलांचा कलगीतुराच सुरु आहे असं समजून प्रेक्षकही हळूहळू किती जवळ येतात याच भान त्यांनाही राहत नाही. मोबाईल रेकॉर्डींगच्या नादात बैल जवळून गेला याची जाणीवही त्यांना होत नाही. अशावेळी दुर्घटना होऊन जीवाचं बरंवाईट झाल्यास जबाबदार कोण असेल ? असा प्रश्न आयोजकांना ही मंडळी विचारत नाहीत.
बैल पळवण्यासाठी बैलांची शेपटी जोरात पिरघळणे, त्यांना खिळे टोचणे हे प्रकार देखील छुप्या पद्धतीने होऊ लागले आहेत. बघणाऱ्यां प्रेक्षकांना फक्त पळणारे बैल दिसतात. मग त्यांना बघून अजून जोरात टाळ्या, शिट्या आणि आरडाओरड सुरु होते. पण ते बैल इतक्या जोरात का पळतायत ? त्यांना विनाकारण का पळवतायत ? हा प्रश्न बघणाऱ्यांना पडत नाही आणि उपस्थितही केला जात नाही हे दुर्देव आहे. या स्पर्धा बघायला जितकी गर्दी होणार तितकं या आयोजकांना आणखी स्पर्धा घेण्यासाठी प्रोत्साहन मिळणार एवढ मात्र नक्की.
आपल्यासाठी शेतात राबणाऱ्या बैलांची जाणिव बळीराजाला असल्याने बैलपोळा हीच त्याच्यासाठी खरी दिवाळी असते. गुराख्याचा पूर्ण दिवस रानात गुरांसोबत आनंदात जातो. वाडा सारवून स्वच्छ करण्यापासून ते पाऊस कितीही उशीरा आला तरी गवताची पेंड पुरेल इतका साठा शेतकरी शेतकऱ्याच्या वाड्यात असतोच. घरातली एक व्यक्ती यासाठी राखीव असतेच. यात काय हयगय झाली तर घर कसं डोक्यावर घेतलं जात हे त्या घरातलेच जास्त सांगू शकतील.बैलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा शेतकरी बैलांना अशा स्पर्धांमधून मृत्यूच्या दाढेत टाकणार नाही. अशावेळी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या, त्याचे आयोजन करणाऱ्या भरलेल्या पोटाच्या मानसिकतेची किव येते. जी इथल्या मातीची परंपरा आणि जाणिव विसरत चालली आहेत. यांना वेळीच समज द्यायला हवी. यंत्रणेने कारवाई करण्याआधी आणि माध्यमांनी बातम्या दाखवल्यानंतर बदनामी झाली म्हणून खापर फोडण्याआधीच या स्पर्धांचा गाशा गुंडाळायला हवा.
नाच आणि नमनाला आवडीने आपण कितीही दूर जातो हे कौतुकाने सांगतो तसे याचे किस्से आता या स्पर्धेंचे सांगितले जात आहेत. त्याचा थरारकपणा रंगवताना ऐकणाऱ्यांनाही त्याच्याबद्दल उत्सुकता वाढत जाते. ते आणखी जवळ येतात आणि कान टवकारून ऐकायला लागतात. मग सांगणाऱ्यालाही आणखी चेव चढतो. पण अशी कहाणी रंगवून सांगणाऱ्यांना आपला पोशिंदा असलेल्या बैल जोडीला किती वेदना होतात ? याबद्दल कोण चकार प्रश्नही विचारत नाही. गावांमध्ये या स्पर्धांच्या जितक्या गझाली रंगतील तितकी या स्पर्धांना गर्दी वाढत जाणार. आणि आयोजकांनाही यामुळे प्रोत्साहन मिळणार. त्यामुळे हळूहळू स्पर्धेची परंपरा रुजून या जीवघेण्या खेळाला कोकणच्या अस्मितेशी जोडण्याआधी हे वेळीच थांबायला हवं.