सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : मुंबई विद्यापीठानं विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयांकडे सोपवल्यानं नवा वाद सुरू झालायं. मुंबई उच्च न्यायालयानंही यावरून विद्यापीठाची चांगलीच कानउघाडणी केलीयं.विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांची जबाबदारी मुंबई विद्यापीठानं महाविद्यालयांकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याने या विरोधात विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतलीय. यावेळी न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला चांगलंच फटकारलंय.
'मुंबई विद्यापीठ महाविद्यालयांकडे परीक्षा सोपवून जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. जर विद्यापीठात काहीच काम शिल्लक ठेवायचे नसेल तर विद्यापीठ बंद करा,' असं परखड मत शुक्रवारी न्यायालयानं नोंदवलं.
याप्रकरणी बाजू मांडण्यासाठी मुंबई विद्यापीठाला २९ ऑक्टोबरची मुदत देण्यात आलीयं.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षेसाठी ६०-४० पॅटर्न राबवण्याचा निर्णयही मुंबई विद्यापीठानं घेतलाय. म्हणजे ६० गुणांची लेखी परीक्षा होईल तर महाविद्यालय ४० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन करेल, असा हा फॉर्म्युला आहे. या दोन्ही निर्णयांवर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
मुंबई विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. वादग्रस्त निर्णय आणि कोर्टबाजी यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं कठीण झाल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.