मुंबई : सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला आहे. साऊथ स्टारही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यातलच एक नाव म्हणजे सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह आहे.
कैंची धाम हा उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील नीम करौली बाबांचा आश्रम आहे. नीम करौली महाराजांवर देशातीलच नव्हे, तर जगातील अनेकांची श्रद्धा आहे. गेल्या वर्षी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी कैंची धामला पोहोचले होते. आता साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू कैंची धाममध्ये पोहोचली आहे.
सामंथा रुथ प्रभूने सोमवारी कैंची धाम येथे पोहोचून नीम करौली बाबांचे आशीर्वाद घेतले. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर कैंची धामचे फोटो शेअर करून याबद्दल माहिती दिली. खरंतर, ती सध्या नैनितालसह उत्तराखंडच्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करत आहे. वरुण धवनसोबत रुसो ब्रदर्सच्या प्रोजेक्ट सिटाडेलच्या शूटिंगसाठी सामंथा येथे गेली आहे. सामंथा 2021 मध्ये चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्येही गेली होती.
समंथा अनेक वर्षांपासून साऊथ चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिला साऊथमधील एक मोठं सुपरस्टार देखील मानलं जातं. आता तिने बॉलिवूडकडेही आपली पाऊलं वळवली आहेत. द फॅमिली मॅन सीझन 2 मध्ये मनोज बाजपेयी या महान अभिनेत्यांसोबत तिने उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. याशिवाय पुष्पा चित्रपटातील एका गाण्यातही समंथा दिसली होती.
साऊथ चित्रपटातील कलाकार समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोटाची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या ४ वर्षानंतर एकमेकांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला. जवळ-जवळ 10 वर्षांच्या नात्याला ब्रेक लावत हे कपल वेगळं झालं. घटस्फोटाच्या घोषणेनंतर, दोन्ही स्टार्स त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाले आहेत आणि त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू लागले आहेत.
अभिनेत्री एका आजाराला तोंड देत असल्याचं समोर आलं आहे. ती मायोसिटिस (myositis) नावाच्या आजाराचा सामना करत आहे. तिने सोशल मीडियावर ही माहिती शेअर केल्यानंतर तिचे चाहते तिच्यासाठी प्रार्थना करु लागले. अनेक कलाकारांनी देखील तिची विचारपूस केली आणि तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं.