Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी... यापुढे कोणीही जर अमिताभ बच्चन यांचा आवाज, फोटो किंवा नाव वापरल्यास त्यांच्यावर थेट कारवाई होणार आहे. दिल्ली हायकोर्टानं हा अंतरिम आदेश दिला. खद्द अमिताभ बच्चन यांनीच यासंदर्भात एक याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल केली होती. विनापरवानगी फोटो आणि आवाज वापरुन सोशल मीडियावर एक जाहिरात प्रसारित होत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता.
आपली प्रतिमा खराब होईल अशा कोणत्याही जाहिरातीत किंवा ऑडिओ-व्हिडिओमध्ये आपलं नाव, फोटो किंवा आवाज वापरण्यास मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. (amitabh bachchan latest news)
अमिताभ बच्चन यांचं नाव, आवाज आणि व्यक्तिमत्व काही कंपन्या चुकीच्या पद्धतीने वापरत आसल्याचं बिग बींनी याचिकेत म्हटलं आहे. कमर्शियल इंडस्ट्रीमध्ये होत असलेला असा वापर थांबवला पाहिजे. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या नावाने एक लॉटरीची जाहिरात चालू आहे, जिथे त्यांचा फोटो प्रमोशनल बॅनरवर वापरण्यात आला आहे.
एवढंच नाही तर, जाहिरातीवर KBC चा लोगो देखील लावण्यात आला आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी असं करण्यात आलं असून यामध्ये काहीही तथ्य नाही. रिपोर्टनुसार बिग बी मोठे कलाकार आहेत. अशात त्यांच्या नावाचा असा वापर करणं चूक असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
बिग बी यांनी जाहिरात कंपन्यांवर प्रसिद्धीच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. 'अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. म्हणून जाहिरातींमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचं प्रतिनिधित्व करणं चुकीचं आहे. जाहिरात कंपन्यांना बिगबींचं नाव आणि आवाज वापरायचा असेल तर ते त्यांची परवानगीनेच करू शकतात, अन्यथा नाही...' असं अमिताभ बच्चन यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.