मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली हे दोघंही त्यांची मुलगी वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवतात. हे दोघंही वामिकाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही आणि मीडियाला देखील तिचे फोटो शेअर करण्यास मनाई करतात. अशातच नुकतंच अनुष्काने आपल्या मुलीचे फोटो शेअर केल्याबद्दल एका मीडिया हाऊसला फटकारलंय
एका मीडिया हाऊसने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर वामिकाचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये वामिका अनुष्का आणि विराट कोहलीसोबत मालदीवमधून परतली असल्याचं दिसत होतं. दरम्यान मीडिया हाऊसने तो फोटो डिलीट केल्यानंतर अनुष्काने 'ती' पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
अनुष्काने पोस्टवर कमेंट केलीये. या कमेंटमध्ये अनुष्का म्हणते, असं वाटतं की, मीडिया हाऊसला मुलांच्या पालकांपेक्षा अधिक माहिती आहे की त्यांच्या मुलासाठी काय चांगलं आहे, कारण मिडीया हाऊस अनेक विनंती केल्यानंतरही फोटो क्लिक करून पोस्ट करतायत. इतर मीडिया हाऊसेस आणि पापाराझींकडून काहीतरी शिका.
वामिकाचा फोटो असलेल्या पोस्टमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या हॅशटॅगचाही समावेश होता. इन्स्टाग्रामवर अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि वामिका कोहली या हॅशटॅग नावाच्या पोस्ट हिडन केल्या आहेत.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली नुकतंच मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. या व्हेकेशनचे फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केलेत. अनुष्काचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.