...म्हणून सैफच्या पाठीत मणक्याजवळ चाकू खुपसला! आरोपीचा पोलीस जबाबात धक्कादायक खुलासा

Attacker On Why He Stabbed Saif Ali Khan Near Spine: पोलीस चौकशीमध्ये आरोपीने सैफ अली खानच्या पाठीत का वार केला हे सांगितलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 22, 2025, 08:07 AM IST
...म्हणून सैफच्या पाठीत मणक्याजवळ चाकू खुपसला! आरोपीचा पोलीस जबाबात धक्कादायक खुलासा title=
सैफवरील हल्ल्यासंदर्भात खुलासा

Attacker On Why He Stabbed Saif Ali Khan Near Spine: बांगलादेशी नागरिकाने अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या पहाटे प्राणघातक हल्ला केला. सैफवर 6 वार करण्यात आले. त्यापैकी सर्वात गंभीर हल्ला हा सैफच्या पाठीच्या कण्याजवळ करण्यात आला. मात्र एका सामान्य चोराने सैफसारख्या अभिनेत्याच्या पाठीवर का हल्ला केला असा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच चोरानेच याबद्दलचा खुलासा पोलीस चौकशीमध्ये केला आहे. 

दोन दिवसांनी ठाण्यातून आरोपीला अटक

सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी अग्निशामनदलासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शिड्यांनी बारा मजले खाली उतरला. त्यानंतर तो या इमारतीच्या बगीचामध्येच दोन तास लपून होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी रविवारी आरोपी शरीफुल इस्लाम सज्जद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर ऊर्फ विजय दासला ठाण्यातील कामगार वस्तीमधून अटक केली. सैफवर हल्ला केल्यानंतर दोन दिवसांनी आरोपी पोलिसांच्या हाती लागला. 

दोन सर्जरी झाल्या

सैफच्या हातावर, मानेवर आणि पाठीवर शरीफुलने वार केले होते. लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सैफवर तातडीने दोन सर्जरी केल्या. त्यापैकी पहिल्या सर्जरीमध्ये सैफच्या पाठीच्या कण्याजवळ आरोपीने खुपसलेल्या चाकूचा तुकडा अडकून होता, तो काढण्यात आला. दुसऱ्या सर्जरीमध्ये सैफच्या मानेवर, हातावर झालेले वार प्लॅस्टीक सर्जरीने भरुन काढण्यात आले. 

नक्की वाचा >> करिनाच्या 'त्या' चुकीमुळे आरोपीला पळून जाण्यात यश आलं! पोलिसांचा दावा; म्हणाले, 'हल्ल्यानंतर तिने फोन...'

सैफने चोराला पकडलं

"आरोपी सैफ राहत असलेल्या सदगुरु शरण इमारतीमधील फ्लॅटमध्ये घुसला. सैफच्या घराच्या बाथरुमच्या खिडकीतून त्याने घरात प्रवेस मिळवला. सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरोपीला पाहिल्यानंतर त्याला हटलं आणि घरात एकच गोंधळ उडाला. सैफ तिथे आला तेव्हा त्याने आरोपीकडून असलेला धोका लक्षात घेत त्याला घट्ट पकडून ठेवलं," असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

...म्हणून सैफच्या पाठीत केला वार

आरोपीने पोलिसांकडे केलेल्या खुलाश्यामध्ये, आपण सैफ अली खानच्या पाठीवर अनेकदा वार करण्याचं कारण सैफने या चोराला घट्ट पकडलं होतं. सैफच्या तावडीतून सुटण्यासाठीच आपण त्याच्या पाठीत सुरा खुपसल्याचं आरोपीने कबूल केलं आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. 

नक्की वाचा >> सैफवर हल्ला झाला तेव्हा बिल्डींगचे सिक्युरीटी गार्ड काय करत होते? मोठा खुलासा; पोलीस म्हणाले, 'आरोपीने स्वतःचे..'

...अन् सैफच्या पाठीच्या कण्याजवळ खुपसला चाकू

"सैफने आरोपीला घट्ट पकडल्याने आरोपीला काही हलचाल करण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळेच त्याने चाकूने सैफच्या पाठीवर हल्ला केला. हल्ला झाल्याने सैफची पकड सैल झाली. सैफवर हल्ला झाल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला आणि सैफच्या घरातील कर्मचारीही आरोपीच्या मागे जाण्याऐवजी सैफला सांभाळण्याच्या उद्देशाने पुढे गेले," असं पोलिसांनी सांगितलं. आरोपी घरातच असल्याचं समजून सैफने जखमी अवस्थेतच घराचं मुख्य दार लावून घेतलं. मात्र आरोपीने घरात ज्या मार्गाने प्रवेश केला तिथूनच पळ काढला. 

पाच दिवस उपचार घेतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला. सैफ चालतच त्याच्या घरी पोहोचल्याचं पाहायला मिळालं.