Baipan Bhari Deva : ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्ती कमाई करत आहे. या चित्रपटानं सगळ्याच प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटातील गाणी, पटकथा, अभिनेत्रींचे लूक्स आणि डायलॉग्स सगळ्याच गोष्टी चर्चेचा विषय ठरत आहेत. या गाण्यांची क्रेझ इतकी वाढली आहे की सोशल मीडियावर त्याचे विविध रील्स पाहायला मिळतात. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की या चित्रपटातील एक गाणं राज ठाकरे यांच्या वडिलांचं आहे. तुमचा या गोष्टीवर विश्वास बसत नसेल पण याविषयी स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितले आहे. केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी ही बातमी दिली आहे.
केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी एक कोलाज शेअर केला आहे. हे कोलाज शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की बाईपण भारी देवा मध्ये खरंतर चार गाणी. त्यातलं टायटल आणि पिंगा हे कोरसची गाणी. त्याला स्वर देणाऱ्या ज्या ज्या आहेत त्यांना नमस्कार! एक सॅड सॉंग आहे.. स्व. श्रीकांत ठाकरे यांचं गाजलेलं गाणं.. 'उघड्या पुन्हा जाहाल्या' नवं गाणं करायचं नव्हतं. कारण ज्या ठिकाणी ते गाणं येतं, नवं गाणं कदाचित तेवढ अपील झालं नसतं, असं मला वाटत. एक nostalgic feel देऊन जात ते गाणं. ते गायलं आहे सुवर्णा राठोड कुलकर्णी यांनी. कमाल गायलय. आज लोकं विचारतात की, ते गाणं रीलीज कधी करणार? लवकरच... आणि… शेवटचं गाणं. 'मंगळागौर' ज्यासाठी केला होता अट्टाहास!! ती सगळी पारंपरिक गाणी एकत्र कोलाज करून सादर करायची होती. हे खेळ रात्रभर चालतात. पण चित्रपटात ते गाणं 3-4 मिनिटाचं हवं होतं. त्याला स्वर देणारी सावनी रविंद्र कम्माल गायली आहे".
पुढे केदार शिंदे म्हणाले, "त्याची सुरूवातीची आरती ज्या सुकूनने ती गायली आहे, तिथेच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात. तिचा आवाज घरंदाज वाटतो. सहा जणींसाठी एकच असला तरी थिएटरमध्ये असा काही घुमतो की, त्यावर काही बायका प्रत्यक्ष तर काही मनातल्या मनात फेर धरून नाचतात. या चित्रपटासाठी या सगळ्यांचं योगदान खुप मोठं आहे."
हेही वाचा : Alia Bhatt नं पापाराझीची चप्पल उचलली आणि त्याच्या....; अभिनेत्रीच्या कृत्यावर रोखल्या नजरा
दरम्यान, राज ठाकरे यांच्या वडिलांचे नाव हे श्रीकांत ठाकरे असं आहे. तर बाईपण भारी देवा या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी-मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्रींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.