नवी दिल्ली : २०१२ मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात करणारा अभिनेता आयुष्मान खुराना आज वयाची ३३ वर्ष पूर्ण करत आहे. आयुष्मानचा जन्म चंदीगड येथे झाला. त्याने सेंट जॉन हायस्कुल मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने पंजाब युनिव्हर्सिटीतून मास्टर्स इन मास कॉम्यूनिकेशन ही पदवी संपादन केली.
५ वर्ष नाटकात काम केल्यानंतर तो पहिल्यांदा एम टीव्ही च्या 'पॉपस्टार' या शो मध्ये झळकला. त्यानंतर २००४ मध्ये 'रोडीज' च्या दुसऱ्या सीजनमध्ये सहभाग घेतला आणि तो शो देखील जिंकला.
आयुष्मानने 'बिग एफएम' मध्ये रेडियो जॉकी मधून देखील काम केले आहे. त्यावेळेस त्याने 'बिग चाय', 'मान ना मान', 'मैं तेरा आयुष्मान' यांसारखे शो होस्ट केले. त्यासाठी २००७ मध्ये त्याला यंग अचिव्हर्स अवॉर्ड देखील मिळाला. त्यानंतर टीव्हीवर अनेक शोज होस्ट करताना तो दिसू लागला.
त्यानंतर २०१२ मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर अनेक चित्रपटात तो काम करू लागला. 'शुभ मंगल सावधान है' हा त्यापैकी एक प्रदर्शित झालेला चित्रपट.
'विकी डोनर' या चित्रपटात आयुष्मानने एक गाणे देखील गायले होते. त्या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेयरचा सर्वोकृष्ट पदार्पण आणि गायक (पुरुष) हे पुरस्कार देखील मिळाले होते. 'पानी दा रंग' हे त्याचे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले.
आयुष्मानने बालमैत्रीण आणि प्रेयसी ताहिरा कश्यप हीच्यासोबत २०११ मध्ये विवाह केला. ताहिरा एक मॉडेल आणि लेखिका आहे. आयुष्मानच्या या संपूर्ण प्रवासावर नजर टाकली असता त्याच्या कामातून त्याचे अष्टपैलूत्व सिद्ध होते.