मुंबई : वैश्विक महामारी म्हणून साऱ्या विश्वासमोर कठीण प्रसंग उभे करणाऱ्या Coronavirus कोरोना व्हायरसविरोधात सर्वांनीच कंबर कसली आहे. अद्यापही लस सापडली नसल्यामुळं या विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात अतिशय झपाट्यानं वाढत आहे. भारतातही याचं चित्र काही वेगळं नाही.
भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातही सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या मुंबईत दर दिवशी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढत आहेत. मुंबईत धारावी येथे असणाऱी मोठी दाटीवाटीची वस्ती कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. परिणामी लॉकडाऊनचे कठोर नियम या भागात लागू करण्यात आले आहेत.
दैनंदिन जीवनावर निर्बंध आल्यामुळं धारावीतील अनेक सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. याच परिस्थितीचा आढावा घेत धारावीकरांसाठी बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगन याने मदतीचा हात पुढे केला आहे. सोबतच त्यानं इतरांनाही धारावीतील या कुटुंबासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
ट्विटरच्या माध्यमातून अजयने याविषयीची माहिती देत लिहिलं, 'धारावी हे कोरोनाच्या महामारीचं मुख्य केंद्र झालं आहे. एमसीजीएमच्या पाठिंब्यानं अनेक मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था येथे काम करत आहेत. गरजवंतांना शिधा आणि हायजिन किट उपलब्ध करुन देत आहेत. आम्हीसुद्धा एडीएफएफच्या माध्यमातून ७०० कुटुंबांना मदत करत आहोत. मी तुम्हालाही या मंडळींची मदत करण्याचं आवाहन करतो'.
Dharavi is at the epicentre of the Covid19 outbreak.Many citizens supported by MCGM are working tirelessly on ground through NGOs to provide the needy with ration & hygiene kits. We at ADFF are helping 700 families.I urge you to also donatehttps://t.co/t4YVrIHg3M#MissionDharavi
— Ajay Devgn (@ajaydevgn) May 27, 2020
एकिकडे अभनेता सोनू सूद हा स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. दुसरीकडे बिग बी श्रमिकांच्या जेवणाची सोय करत आहेत तर, आता अजय देवगनही त्याच्या परिनं मुंबईतील धारावीत असणाऱ्या कुटुंबांचा आधार झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. कलाविश्वातील या आणि अशा कित्येक सेलिब्रिटींनी या संकटाच्या प्रसंगी सढळ हस्ते मदत करत समाजाप्रतीची आपली जबाबदारी पार पाडण्यास सुरुवात केली आहे.