मुंबई: 'संस्कारी बाबुजी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते आलोकनाथ यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर कलाविश्वात सर्वत्र खळबळ पाहायला मिळत आहे.
फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांच्यावर नाव न घेता हे आरोप करण्यात आले असून जवळपास २० वर्षांपूर्वी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.
आपल्यावर करण्यात आलेल्या या सर्व आरोपांचं आलोकनाथ यांनी खंडन केलं असून, 'एबीपी न्यूज'शी संवाद साधत त्यांनी याप्रकरणी आपली बाजू मांडली.
'मी ते आरोप नाकारतही नाही आणि स्वीकारतही नाही. त्या म्हणत आहेत तसा प्रसंग (लैंगिक अत्याचार) ओढावलाही असेल. पण, दोषी मात्र कोणी दुसरीच व्यक्ती असेल. मला याविषयी आणखी कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण विषय उगाचच ताणला जाईल', असं ते म्हणाले.
फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत एका अशा प्रसंगाविषयी वाच्यता केली जे वाचून अनेकांना धक्काच बसला.
मुख्य म्हणजे आलोकनाथ आणि त्यांच्यावर आरोप करणारी व्यक्ती यांच्या कुटुंबामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. पण, या घडीला त्यांनी (विनता) आरोप करत अतिशय मोठं आणि गंभीर वक्तव्य (आरोप) केलं आहे, असं म्हणत आलोकनाथ यांनी नाराजी व्यक्त केली.
कलाविश्वात त्यांचं जे काही स्थान आहे ते फक्त माझ्यामुळेच असल्याचंही आलोकनाथ म्हणाले.
इतक्यावरच न थांबता आजच्या घडीला समाजात महिला जे काही वक्तव्य करत आहेत, त्यालाच विचारात घेतलं जात आहे. तेव्हा सध्यातरी याविषयी काहीही बोलणं चुकीचं ठरेल, असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष वेधल्याचं कळत आहे.
'बाबुजीं'चं हे वक्तव्य पाहता आता त्यावर पुढे काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.