मुंबई : एकिकडे इंग्लंडमध्ये क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे कलाविश्वातही क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. हे वारे आहेत थेट १९८३ च्या काळातले. कपिल देव आणि त्यांच्या संघाने १९८३ या वर्षी क्रिकेट विश्वचषकावर भारतीय संघाचं वर्चस्व दाखवून दिलं आणि एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.
विजयाच्या याच पर्वाला उजाळा देत दिग्दर्शक कबीर खान '`८३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये आता अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्या नावाचीही जोड मिळाली आहे.
रणवीर सिंग या चित्रपटात खुद्द कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. तर, दीपिका त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी, रोमी देव यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. खऱ्याखुऱ्या आयुष्यातील सहचारिणीसोबत ऑनस्क्रीन झळकण्याची लग्नानंतरची रणवीरची ही पहिलीच वेळ. त्यातही ती त्याच्या पत्नीच्याच भूमिकेत झळकणार असल्यामुळे रणवीरचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे.
ग्लासगोमध्ये चित्रपटाच्या टीममध्ये दीपिका सहभागी झाल्याचा आनंद त्याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत व्यक्त केला. यामध्ये माझ्या पत्नीहून चांगली ऑनस्क्रीन पत्नी आणखी कोण साकारू शकतं....? असं कॅप्शन देत त्याने आनंद व्यक्त केला.
रणवीरने शेअर केलेल्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये दीपिकाही चित्रपटाच्या टीममध्ये सहभागी झाल्यामुळे उत्साहात आणि आनंदात दिसत आहे. तर, या जोडीच्या येण्याने दिग्दर्शक कबीर खानच्या चेहऱ्यावरील आनंदही लपलेला नाही. एकंदरच या कलाकारांचा उत्साह पाहता रुपेरी पडद्यावरच्या या सामन्याची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचत आहे.
विश्वचषक विजयाची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटातून फक्त रणवीरच नव्हे, तर इतरही बरेच कलाकार झळकणार आहेत. या सर्वच कलाकारांनी क्रिकेटचं रितसर प्रशिक्षण घेतलं होतं. परिणामी प्रत्येकानेच खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या मैदानावर घाम गाळल्याचं पाहायला मिळालं.