7 वर्षांपूर्वी बॉलिवूडचा हा अभिनेता दिसला 'विलन'च्या भूमिकेत; बॉक्स ऑफिसवर केली 500 कोटींहून अधिक कमाई

7 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत' या चित्रपटातील अलाउद्दीन खिलजीची भूमिका ही सर्वाधिक पसंतीची ठरली. अलाउद्दीनचे पात्र साकारण्यासाठी अभिनेत्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. 

Updated: Jan 25, 2025, 02:01 PM IST
7 वर्षांपूर्वी बॉलिवूडचा हा अभिनेता दिसला 'विलन'च्या भूमिकेत; बॉक्स ऑफिसवर केली 500 कोटींहून अधिक कमाई title=

बॉलिवूड सिनेसृष्टीत असे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले ज्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरुन बॉक्स ऑफिसवर गडगंज कमाई केली. अशा चित्रपटांमधून कलाकारांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. सात वर्षांपूर्वी बॉलिवूडचा असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्याने एक भितीदायक भूमिका साकारली होती, ज्यामुळे त्या अभिनेत्याने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. 

बॉलिवू़ड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंग हा मजेशीर आणि रोमँटिक चित्रपटांसाठी ओळखला जात होता. त्याने सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत' या चित्रपटात अल्लाउद्दील खिलजीची भूमिका साकारली होती. रणवीरने साकारलेली ही भूमिका भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक पसंती मिळालेल्या भूमिकांपैकी एक ठरली. 'पद्मावत' या चित्रपटाला आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 

रणवीरची चित्रपटातील अवघड भूमिका

रणवीरने या चित्रपटातील सर्वात अवघड भूमिका साकारण्याची जोखिम घेतली होती. आपल्या मजेशीर आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीरने अलाउद्दीन खिलजीच्या निर्दयी आणि दुष्ट भूमिका साकारण्याचे जबरदस्त परिवर्तन केले. रणवीरने साकारलेल्या या भूमिकेमुळे प्रेक्षक आणि चाहते थक्क झाले होते. अलाउद्दीन म्हणून चित्रपटात झळकण्यामागे रणवीरची बरीच मेहनत होती. सर्वांनाच परिचित असलेल्या मोहक व्यक्तिमत्त्वाला बाजूला ठेवून, त्याने अलाउद्दीनचे भितीदायक पात्र त्याकाळी आत्मसात केले. त्याने साकारलेली ही भूमिका त्याच्या रोमँटिक आणि आनंदी पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती आणि यातून प्रेक्षकांना त्याच्या वेगवेगळे पात्र साकारण्याचे कौशल्य दिसले. 

अलाउद्दीन खिलजीची भूमिका सर्वात वेगळी

अलाउद्दीनच्या भूमिकेतील रणवीरचा अभिनय हा सर्वात वेगळा होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेवरुन अलाउद्दीनचे पात्र जिवंत ठेवण्यामागे रणवीरने घेतलेली मेहनत स्पष्ट होते. या भूमिकेसाठी रणवीरने 'मेथड अ‍ॅक्टिंग' या अनोख्या शैलीच्या मदतीने अलाउद्दीनचे व्यक्तीमत्त्व समजून घेतले. बाह्य जगापासून पूर्णपणे वेगळा राहण्याच्या रणवीरच्या प्रयत्नात त्याच्या मानसिक अवस्थेवर सुद्धा खोल परिणाम झाला. रणवीरने खिलजीचे गंभीर व्यक्तिमत्त्व इतके खोलवर समजून घेतले की त्यापासून त्याला काही काळानंतर स्वतःला वेगळे करणे कठीण झाले. परंतु, रणवीरच्या ही भूमिका साकारण्याच्या मेहनतीमुळेच चित्रपटातील अलाउद्दीनचे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीचे ठरले.

 

रणवीर सिंगचे हीट चित्रपट

रणवीरने नेहमीच बॉलिवूडमध्ये हीट चित्रपट दिले आहेत. 'सिंघम अगेन' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील 'सिम्बा' हे पात्र तर प्रेक्षकांना खूपच आवडले. आता आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या रणवीरच्या आगामी चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. नुकतंच, या चित्रपटाच्या सेटवरील फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत, ज्यामध्ये रणवीर दाढी, विसकटलेले केस आणि पगडीमध्ये अशा खास लुकमध्ये दिसत आहे. चाहते या लुकची तुलना पद्मावत चित्रपटातील अलाउद्दीनच्या पात्राशी करत आहेत आणि रणवीरच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत.