Alia bhatt Viral Video : गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवुड अभिनेत्री डीपफेक्सच्या बळी ठरल्या आहेत. सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मात्र आता रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ, काजोल आणि सारा तेंडुलकरनंतर आता या यादीत आलिया भट्टचे नाव जोडले गेले आहे. अभिनेत्री आलिया भट्टचा एक डीपफेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र व्हिडीओ पाहून अंदाज लावता येतोय की हा व्हिडीओ खोटा आहे. पण आता आलिया भट्टलाही डीपफेकचा बळी बनवल्याने सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अभिनेत्री आलिया भट्टही डीपफेक व्हिडिओची शिकार झाली आहे. रश्मिका मंदाण्णाप्रमाणेच आलियाचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलीच्या व्हिडिओवर आलियाचा चेहरा लावण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडीओमधली तरुणी अश्लिल हावभाव करताना दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये आलिया भट्टला अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आलिया भट्टच्या नावाने व्हायरल केला जात आहे. मात्र डीपफेकचा वापर करुन हा व्हिडीओ तयार केल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदान्नाच्या व्हायरल व्हिडिओनंतर डीपफेकचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, व्हायरल झालेला व्हिडिओ रश्मिकाचा नसून झारा पटेलचा असल्याचे लगेचच समोर आलं होतं. अनेक कलाकारांनी या डीपफेकवर कठोर कारवाई आणि कायदा करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही डीपफेकचे प्रकरण थांबले नाही. अभिनेत्री त्याचा बळी ठरल्या आहेत. या यादीत काजोल, कतरिना कैफ आणि सारा तेंडुलकर यांचीही नावे आहेत. टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबेर आणि अनुष्का सेन याही डीपफेकच्या बळी ठरल्या आहेत.
डीपफेक काय आहे?
डीपफेक व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआयच्या मदतीने तयार केले जात आहे. कोणताही व्हिडिओ लोकप्रिय अभिनेत्री किंवा प्रसिद्ध चेहऱ्यासोबत मिसळून एडिट केला जातो. अशा प्रकारे हा बनावट व्हिडिओ बनवला जातो. यामध्ये अश्लिल व्हिडीओ देखील तयार केले जातात. यानंतर तो सोशल मीडियावर शेअर केला जातात. बहुतेक व्हिडिओ बोल्ड किंवा अश्लील असतात. अधिक लाईक्स आणि कमेंट्स मिळण्यासाठी हे काम केले जाते.
डीपफेकबाबत सरकारची कठोर भूमिका
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी शुक्रवारी डीपफेकबाबत कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. "डीपफेकसारख्या आक्षेपार्ह मजकुराचा त्रास झाल्यास सरकार त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयटी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात नागरिकांना मदत करेल. आयटी नियमांनुसार अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना त्यांच्या वापराच्या अटींना अंतिम रूप देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे," असेही केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले.