मुंबई : एखाद्या नात्याची आपल्या जीवनात जेव्हा सुरुवात होते, तेव्हा त्या नात्यामुळेच आपठण एक व्यक्ती म्हणऊनही घडत असतो. पण याच नात्यात दुरावा येतो तेव्हा? तेव्हा नेमकं काय होतं याबाबतचा अतिशय महत्त्वाचा उलगडा केला आहे, अभिनेत्री दिया मिर्झा Dia Mirza हिने.
जवळपास पाच महिन्यांच्या वैवाहिक जीवनानंतर दियाने तिच्या पतीसोबतच्या नात्यात दुरावा आल्याचं जाहीर केलं होतं. पती साहिल संघा याच्यासोबतच्या नात्यातून आपण वेगळं होत असल्याचं तिने काही महिन्यांपूर्वी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून म्हटलं होतं. ज्यानंतर आता तिने या अतिशय महत्त्वाच्या निर्णयानंतर तिच्या जीवनावर नेमके काय परिणाम झाले, कोणते बदल झाले याचा उलगडा केला.
'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, जीवनात होणारा कोणताही बदल हा आव्हानात्मक असतो असं दिया म्हणाली. 'आयुष्यातील प्रत्येक बदल हा आव्हानात्मक, वेदनादायक आणि कठीण असतो. पण, तुमचं काम हे त्यावर औषधाप्रमाणे परिणाम करत असतं. तुमचं काम, कारकिर्दच या काळात एक व्यक्ती म्हणून तुम्हाला पुढे जाण्याच प्रवृत्त करत असते, आनंद शोधत जगण्याचा मार्ग दाखवत असते. मी स्वत:ला फारच नशीबवान समजते की, मला अशी कामं करण्याची संधी मिळाली. ही संधी मी स्वत:ला दिली ज्यामुळे या (वेगळं होण्याच्या) वेदनेला अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आलं', असं दियाने स्पष्ट केलं.
जीवनाच्या या टप्प्यावर मला स्वत:च्या अंतर्मनाच्या आवाजाचा शोध आहे, जो मला आणि इतरांना सबळ करत राहील, अशा शब्दांत तिने जीवनातील महत्त्वाच्या आणि तितक्याच आव्हानात्मक प्रसंगावर भाष्य केलं.