मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या #MeToo विषयीच्या चर्चा आणि त्यामुळे अनेक विषयांनी वर काढलेलं डोकं पाहता हा मुद्दा आता येत्या काळातही संपूर्ण कलाविश्वात बराच गाजणार असंच चित्रं सध्याच्या घडीला दिसत आहे.
कलाकार मंडळी या विषयावर आपली मतं मांडत असतानाच अभिनेत्री कल्की कोचलीन हिनेसुद्धा आता या मुद्द्यावर एक वेगळा दृष्टीकोन सर्वांसमोर ठेवला आहे.
चित्रपटांमध्ये असणाऱ्या इंटिमेट दृश्यांविषयी तिने एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला.
अनेकदा आपल्याला अनोळखी व्यक्तीसोबत (अभिनेत्यासोबत) इंटिमेट दृश्य साकारावी लागतात, ही बाब चुकीची असल्याचं तिने स्पष्ट केलं.
'मी अनेकदा अशी दृश्य साकारली आहेत, ज्यामध्ये मी समोरच्या व्यक्तीला ओळखतही नव्हते. अशा वेळी ते किसिंग सीन साकारणं अतिशय अवघड व्हायचं. या गोष्टींमध्ये काही तथ्यच नाही. कारण मुळातच कलाकारांमध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे', असं ती म्हणाली.
एखाद्या साहसदृश्याच्या वेळी त्याचा सराव कलाकारांकडून करण्यात येतो. चित्रीकरणाच्या वेळी समोरच्या कलाकाराला चुकून कोणतीही दुखापत होऊ नये याची काळजी त्यावेळी घेण्यात येते. मग, इंटिमेट दृश्यांच्या वेळी अशा प्रकारची कोणतीच बाब लक्षात का येत नाही?, असा सवाल तिने उपस्थित केला.
टाटा लिटरेचर लाईव्ह या कार्यक्रमात कामाच्या ठिकाणी असणाऱ्या शिष्ठाचाराविषयीच्या एका चर्चेत ती सहभागी झाली होती. त्याचवेळी तिने आपले हे विचार सर्वांसमोर मांडले.